राय मतदारसंघ आता महिला (एसटी) साठी राखीव

दक्षिण गोव्यात महिलांसाठी एसटीचे दोन मतदारसंघ

Story: प्रतिनिधी । पणजी |
20 mins ago
राय मतदारसंघ आता महिला (एसटी) साठी राखीव

पणजी: गोवा राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षणाच्या अधिसूचनेत किरकोळ बदल केले आहेत. त्यानुसार, दक्षिण गोव्यातील राय (Raia) मतदारसंघ आता महिला अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव करण्यात आला आहे. पूर्वीच्या अधिसूचनेत हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव ठेवण्यात आला होता. या दुरुस्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे.

निवडणुकीची तारीख पुढे ढकलली

जिल्हा पंचायत निवडणूक पूर्वी १३ डिसेंबर रोजी होणार होती, परंतु ती आता एक आठवडा पुढे ढकलून २० डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश पंचायत सचिवांनी जारी केला आहे. मात्र, निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आणि आचारसंहितेची अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मॅन्युएल बॉर्जेस, गजानन तिळवे आणि मोरीना रिबेलो यांनी आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर उद्या, मंगळवारी (२५ नोव्हेंबर २०२५) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता आणि तारखेची अधिसूचना जारी होण्याची शक्य ता नाही.

आरक्षण बदलाचा परिणाम

उच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने ही किरकोळ दुरुस्ती केली आहे. पूर्वी दक्षिण गोव्यात केवळ रिवण हा एकच मतदारसंघ महिला एसटीसाठी राखीव होता. आता राय हा मतदारसंघही महिला एसटीसाठी राखीव ठेवल्यामुळे, दक्षिण गोव्यात महिला अनुसूचित जमातीसाठी दोन मतदारसंघ आरक्षित झाले आहेत.

हेही वाचा