वृद्धाला ४.७४ कोटींना लुबाडणाऱ्या कोल्हापूरच्या भामट्याला अटक

ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून घातला होता गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
56 mins ago
वृद्धाला ४.७४ कोटींना लुबाडणाऱ्या कोल्हापूरच्या भामट्याला अटक

पणजी : तिसवाडी तालुक्यातील एका ७२ वर्षीय निवृत्त व्यक्तीला राज्यातील सर्वांत मोठ्या ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यात ४.७४ कोटी रुपये गमावावे लागले होते. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने सूरज एकनाथ सावंत (कोल्हापूर-महाराष्ट्र) याला अटक केली. त्याच्या बँक खात्यात वरील रकमेतील ८० लाख रुपये जमा झाले होते. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आले आहे.
तिसवाडीतील ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ऑगस्ट २०२५ च्या मध्यात सोशल मीडियावर बनावट इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) योजनेची जाहिरात दिसली. या योजनेअंतर्गत पात्र संस्थात्मक खरेदीदार या नावाने गुंतवणूक ऑफर देण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला ‘पेटीएम मनी’शी संलग्न असल्याचे भासवून, कायदेशीर आणि उच्च परतावा देणारी योजना असल्याचे आमिष दाखवले.
ज्येष्ठ व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवून अनेक हप्त्यांमध्ये ४.७४ कोटी रुपये जमा केले. मात्र सर्व पैसे हस्तांतरित झाल्यानंतर गुंतवणूकदारांशी संपर्क तुटला आणि कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी अज्ञात वॉट्सअॅप क्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांना महाराष्ट्रातील जालना येथे असलेल्या एका बँक खात्यात ८० लाख रुपये जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने अविष्कर देविदास सुराडकर याला अटक करून कारवाई केली. दरम्यान, त्याला कोल्हापूर येथील एक व्यक्तीने मदत केल्याचे समोर आले. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंदार देसाई, कॉन्स्टेबल शांताराम नरसे आणि महेश गावडे यांचे पथक महाराष्ट्रात रवाना करण्यात आले. पथकाने कोल्हापूर येथून सूरज सावंत याला अटक करून गोव्यात आणले.
चौकशीदरम्यान अविष्कर देविदास सुराडकर याच्या खात्यात एकूण १३.१० कोटी रुपयांची आवक झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या घोटाळ्यातील ३० लाख रुपये एका महिलेच्या बँक खात्यात जमा झाल्याचेही पोलिसांना समजले आहे. सध्या तिला चौकशीसाठी नोटीस बजावून सायबर विभागाने तिला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.            

हेही वाचा