गोवा : फुटीर नेत्यांना काँग्रेसमध्ये ‘नो एन्ट्री’!

अमित पाटकर : युती पक्षांच्या अध्यक्षांची मंगळवारी बैठक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
गोवा : फुटीर नेत्यांना काँग्रेसमध्ये ‘नो एन्ट्री’!

पणजी : पक्ष फोडून गेलेल्यांना परत पक्षात घेणार नाही, अशी काँग्रेस (Indian National Congress) पक्षाची ठाम भूमिका आहे. जर दुसऱ्या कोणत्याही पक्षाने त्यांना घेतले असेल, तर हा प्रश्न त्या राजकीय पक्षाला विचारावा, त्यांच्या वतीने मी बोलू शकत नाही. झेडपी निवडणुकीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी आम्ही युती पक्षांच्या अध्यक्षांची मंगळवारी बैठक बोलावली आहे, असे गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी आमदार इजिदोर फर्नांडिस (Isidore Fernandes) हे १० आमदारांसह काँग्रेस पक्ष फोडून भाजपमध्ये सामील झाले होते. पण अलीकडेच काँग्रेसचा आघाडी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डमध्ये (Goa Forward) इजिदोर फर्नांडिस यांनी प्रवेश केल्यामुळे राजकीय स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याबद्दल पाटकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागण्यात आले.

सध्या काँग्रेससह तीन राजकीय पक्ष युतीबद्दल चर्चा करून पुढील निर्णय घेतील, असे पाटकर म्हणाले. मी इतर पक्षांच्या अध्यक्षांना बैठकीसाठी फोन केला होता. पण ते इतर कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे तसेच सध्या लग्नाचे दिवस असल्यामुळे भेटीची वेळ जुळवता आली नाही. सध्या तीन राजकीय पक्षांच्या प्रमुखांना एकत्र आणण्याचा प्रयत्न मी केला आहे. एकला चलो रे म्हणत ‘आप’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.

भाजपचे उमेदवार जाहीर झाल्यावर काँग्रेस करणार उमेदवारांची घोषणा

निवडणुकीची तारीख अधिसूचित झाल्यावर आणि भाजपने आपले उमेदवार अगोदर जाहीर केल्यावर आम्ही लगेच उमेदवार जाहीर करू. अगोदर निवडणुकीची अधिसूचना येऊन तारीख जाहीर झाली की, आम्ही उमेदवार जाहीर करण्यास तयार आहोत. आम्ही अगोदर उमेदवार जाहीर केले, तर भाजपकडून आमच्या उमेदवारांना आणि लोकांना लक्ष्य करायला सुरुवात होईल. आमचे उमेदवार काम करत आहेत. इच्छुक उमेदवारांना आम्ही काम करण्यासाठी अनधिकृतपणे सांगितले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

हेही वाचा