‘ही-मॅन’चा अस्त

धर्मेंद्र यांची एक्झिट हे फक्त एका अभिनेत्याचे जाणे नव्हे, तर त्यांच्यासोबत सभ्यता, नम्रता, साधेपणा कायम जपणारा एक चांगला माणूसही हरपला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी १९६० ते १९८० ही दोन दशके प्रचंड गाजवली. म्हणजे रोमँटिक, अॅक्शन, विनोद, भावनिक अशा अभिनयाच्या साऱ्याच बाजू त्यांनी समर्थपणे पेलल्या.

Story: संपादकीय |
48 mins ago
‘ही-मॅन’चा अस्त

कोणीही गॉडफादर नसताना स्वतःच्या बळावर आणि गुणवत्तेवर बॉलिवूडमध्ये प्रवेश करून सिनेसृष्टीवर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे आणि ज्यांची ओळखच भारतीय सिनेसृष्टीतील पहिला ‘ही-मॅन’ म्हणून आहे, अशा गुणी अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन म्हणजे सिनेक्षेत्राच्या एका युगाचाच अंत आहे. ‘ही-मॅन’ अशी प्रतिमा असूनही सर्वसामान्य राहणीमान आणि सर्वांना नेहमी आदराने वागवणारे हे अभिनेते सर्वांच्याच नेहमी स्मृतीत राहतील. १९६० ते १९८५ दरम्यान अनेक गाजलेले चित्रपट देणारे आणि त्यानंतरही चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिलेले धर्मेंद्र गेले काही दिवस गंभीर आजारी होते. त्यांना नुकतेच एका इस्पितळात दाखल करून घरी पाठविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्याने प्रसारमाध्यमांनाही जनमानसांतून तीव्र नाराजी सोसावी लागली होती. धर्मेंद्र यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र शरीराने गेले असले तरी चित्रपट चाहत्यांच्या मनात ते कायम राहतील. त्यांचा सुवर्णकाळ उलटून गेल्यानंतरही काही निवडक अभिनेत्यांपैकी धर्मेंद्र एक होते, ज्यांना नेहमी लोकांकडून सन्मान मिळाला. कारण धर्मेंद्र हे स्वतः दुसऱ्यांना सन्मानाने वागवत असत. त्यांच्या स्वभावाचे अनेक किस्से आजही सिनेक्षेत्रात चर्चिले जातात. अनेकांसाठी प्रेरणा ठरलेले धर्मेंद्र गेल्यामुळे सिनेसृष्टीच नव्हे तर देशही शोकाकूल झाला आहे. 

१९५८-५९ मध्ये फिल्मफेअरने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धा आयोजित केली होती. त्याहीपूर्वी धर्मेंद्र मुंबईत येऊन लहान लहान काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. पण त्यांचे नशीब बदलले ते फिल्मफेअरच्या ‘टॅलेंट हंट’ने. तिथे ते परीक्षकांच्या नजरेत आले. तिथून पुढे जो प्रवास झाला तो इतिहास आहे. धर्मेंद्र यांचा हा प्रवास ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या १९६० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने सुरू झाला, तो पुढे अनेक दशके चालला. आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर, संवादांमधील वेगवेगळ्या शैलीमुळे धर्मेंद्र यांचे अनेक डायलॉगही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहेत. ‘मैं तेरा खून पी जाऊँगा’ या संवादाला तर धर्मेंद्र यांचाच टॅग लागला आहे. तो त्यांनीच म्हणावा. वेगळा दमदार आवाज, प्रसंगाप्रमाणे संवाद फेक, आक्रमकता असेल तर रक्त सळसळून टाकणारी देहबोली. विनोदी भूमिकाही तितक्याच ताकदीने पेलल्या, हे शोले सारख्या अनेक चित्रपटांमधून सर्वांनी अनुभवले. भावनिक, आक्रमक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकांमधून धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलेच, पण अॅक्शन हिरो म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली. ‘फूल और पत्थर’ या चित्रपटातून अॅक्शन हिरोची त्यांची प्रतिमा तयार झाली. ‘शोला और शबनम’, ‘अनुपमा’, ‘पूरब और पश्चिम’, ‘फूल और पत्थर’, ‘चुपके चुपके’ अशा अनेक चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी आपली ओळख प्रस्थापित केली. ‘शोले’ चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो, तसेच त्या चित्रपटाने धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनाही अफाट प्रसिद्धी दिली, हेही मान्य करावे लागेल. त्या चित्रपटातील अमिताभ-धर्मेंद्र यांच्या जय-वीरूच्या भूमिका तर अशा अजरामर झाल्या की दोन चांगल्या मित्रांना हीच नावे लोक देऊ लागले. 

धर्मेंद्र यांनी केलेला संघर्ष, स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलेली ओळख यामुळे नेहमीच त्यांच्याविषयी आदरच व्यक्त झालेला दिसला. त्यांच्या कुटुंबात पुढे मुलांनी तोच वारसा पुढे नेला. धर्मेंद्र यांची एक्झिट हे फक्त एका अभिनेत्याचे जाणे नव्हे, तर त्यांच्यासोबत सभ्यता, नम्रता, साधेपणा कायम जपणारा एक चांगला माणूसही हरपला आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी १९६० ते १९८० ही दोन दशके प्रचंड गाजवली. म्हणजे रोमँटिक, अॅक्शन, विनोद, भावनिक अशा अभिनयाच्या साऱ्याच बाजू त्यांनी समर्थपणे पेलल्या. राजकारणात आले, पण तिथेही त्यांनी कधी सभ्यता सोडली नाही. त्यांनी तिथेही आपली लोकप्रियता कायम राखली. पंजाबमधील एका साध्या कुटुंबातून चित्रपट क्षेत्रात आलेल्या धर्मेंद्र यांनी कोट्यवधी लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवले. गेल्या काही वर्षांपासून ते चित्रपटांतून कमी, पण अनेक कार्यक्रमांमधून टीव्हीवर दिसत असत. जिथे जायचे तिथे त्यांच्या स्वभावामुळे ते मने जिंकत असत. माणुसकीचा त्यांनी जो जपलेला वसा नेहमी सर्वांच्याच स्मरणात राहील. भारतीय सिनेमावर अधिराज्य गाजवणाऱ्या एका पर्वाचा हा अंत असला, तरी त्यांना कधी विसरता येणार नाही.