
भारतीय क्रिकेट संघाला घरच्या मैदानावर हरवणे अनेक वर्षांपासून जवळपास अशक्य मानले जात होते. २०१३ ते २०२२ या सुवर्णकाळात भारताने आपल्या भूमीत कसोटी मालिकांमध्ये जवळपास अपराजित वर्चस्व राखले. मात्र, गेल्या काही महिन्यांत परिस्थिती वेगाने बदलताना दिसत आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून क्लीन स्वीप झाल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका गमावण्याची भीती भारतीय संघावर घोंगावत आहे.
पहिली कसोटी गमावलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या सामन्यातही स्थिती नाजूक आहे. सामन्याचा बराचसा प्रवाह पाहता पराभव निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेचा धनी ठरत आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताची कामगिरी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपावर भारताने नाव कोरले. मात्र गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कसोटी क्रिकेटचे आकडे चिंताजनक आहेत. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने एकूण १७ कसोटी सामने खेळले आहेत. भारताने कसोटीत आतापर्यंत ७ विजय, ९ पराभव आणि २ कसोटी अनिर्णित राखल्या आहेत. भारताचा विजयाचा टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. भारतीय टीमसाठी हा अत्यंत चिंताजनक आकडा आहे, विशेषतः घरच्या परिस्थितीत. गेल्या वर्षी न्यूझीलंडने भारतात येऊन कसोटी मालिकेत भारताला सलग दोन्ही सामन्यांत पराभूत केले. सध्या सुरू असलेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिका भारतीय संघावर दडपण आणत आहे. पहिल्या कसोटीत सहज विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही प्रबळ स्थितीत आहे. जर दक्षिण आफ्रिका ही मालिका जिंकली, तर भारताला घरच्या मैदानावर सलग दुसरी कसोटी मालिका गमवावी लागेल. दक्षिण आफ्रिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरेल. कारण भारतात कसोटी जिंकणे इतिहासात क्वचितच घडले आहे.
भारतीय क्रिकेटसाठी मात्र हा मोठा धक्का आणि अभूतपूर्व लाजिरवाणी घसरण ठरेल. भारताच्या सततच्या अपयशानंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये गंभीर टीका होत आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी सामन्यांमध्ये परदेशात लढाऊ कामगिरी केली असली, तरी घरच्या मैदानावरचा पराभव हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर असा संकटाचा काळ दशकभर पाहिलेला नव्हता. सलग दोन मालिकांमध्ये पराभवाची भीती, कसोटी क्रिकेटमधील घसरण आणि प्रशिक्षक गौतम गंभीरच्या धोरणांवरील प्रश्नचिन्ह या सर्व गोष्टी एकत्रित येत भारतीय क्रिकेटसाठी मोठा इशारा आहे.
- प्रवीण साठे