धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी कॅथलिक असोसिएशनची तक्रार

पणजी : गोव्यात २५ ते २८ डिसेंबर दरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘कामसूत्रच्या कथा आणि ख्रिसमस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमामुळे सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कॅथलिक असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष सिरील फर्नांडिस यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, भगवान रजनीश संस्था आणि ओशो लुधियाना ध्यान संस्थेच्या संस्थापकांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
सिरील फर्नांडिस यांनी केलेल्या दाव्यानुसार, या कार्यक्रमाच्या शीर्षकामुळे सामाजिक आणि धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला यापूर्वीच राज्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी विरोध दर्शवला होता.
वादग्रस्त जाहिरातीचा आमदार फेरेरांकडून निषेध
ख्रिसमस काळात आयोजित कार्यक्रमाची ऑनलाइन जाहिरात समाजमाध्यमांवर फिरत असून ती ख्रिसमस सणाची बदनामी करणारी व ख्रिस्ती धर्माचा अपमान करणारी असल्याचा तीव्र निषेध हळदोणा येथील आमदार अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी भाजप सरकारातील कोणता एजंट सहभागी होता का? असा सवाल फेरेरांनी उपस्थित केला. ‘टेल्स ऑफ कामसूत्र अँड ख्रिसमस सेलिब्रेशन’ या नावाची जाहिरात २५ ते २८ डिसेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी भगवान श्री रजनीश फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत ‘योगदान’ म्हणून २४,९९५ रुपये नमूद केले असून, कामसूत्रासोबत ख्रिसमसचा उल्लेख करण्यात आला आहे. हा ख्रिस्ती धर्माचा आणि ख्रिसमसचा पूर्ण अपमान आहे. गोमंतकियांना विकत घेता येईल आणि गोव्यात काहीही चालेल अशी ही विकृत मानसिकता आहे, असे फेरेरा म्हणाले.
या जाहिरातीमुळे गोव्यात संताप उसळला असून, कॅथॉलिक आणि बिगर-कॅथॉलिक अशा अनेक लोकांनी संपर्क साधल्याचे फेरेरा यांनी सांगितले. ते म्हणाले, ड्रग्स, बलात्कार, खून, दरोडे सगळे मोकळेपणे सुरू आहेत आणि आता याची भर पडली आहे. हे थांबवण्याची वेळ आली आहे.
तत्काळ कारवाईची मागणी
फेरेरा यांनी मुख्य सचिव आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधित जाहिरातीच्या आयोजकांवर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, हा कार्यक्रम कुठे होणार आहे, याची माहिती मिळाल्यास आम्हाला कळवा, जेणेकरून तो थांबवता येईल.
कसून चौकशी करा; आर्चबिशप यांची मागणी
आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांनी ख्रिसमसचा संबंध गैर प्रकाराशी जोडणाऱ्या जाहिरातीचा निषेध केला आहे. ख्रिसमस हा आनंद, शांती आणि देवाच्या प्रेमाचा पवित्र सण आहे. याचा संबंध गैर कृत्यांशी जोडण्याच्या प्रकाराची कसून चौकशी व्हायला हवी. त्यांनी प्रत्येकाच्या भावनांचा आदर करून धार्मिक एकोपा राखण्याची गरज असल्याचे सांगितले.
सामाजिक संस्थांचा विरोध
भगवान रजनीश फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम २५ ते २८ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता.गोवा महिला मंच, बायलांचो एकवट, अर्ज आणि कॅथोलिक असोसिएशन ऑफ गोवा या संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला. या कार्यक्रमामुळे गोवा लैंगिक पर्यटनाचे ठिकाण बनण्याची भीती सामाजिक संस्थांनी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात निवास आणि जेवणासह सहभागी होण्यासाठी २४,९९५ रुपये शुल्क होते.पा राखण्याची गरज असल्याचे सांगितले.