शिक्षण आणि अध्यात्म

तुम्ही तुमच्या विचार आणि भावना यामुळे वाहून गेला आहात, पण तुमची मुले जीवनाच्या खूप जवळ आहेत. जर जगाने मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याकडून शिकले, तर हे एक अतिशय सुंदर ठिकाण असेल.

Story: विचारचक्र |
23rd November, 10:29 pm
शिक्षण आणि अध्यात्म

सद्गुरू : जर एखादे मूल काहीही गृहीत न धरता मोठे होत असेल, जर ते इतर लोकांच्या प्रभावाशिवाय जगत असेल, त्याच्या स्वतःच्या स्वाभाविक बुद्धिमत्तेने, तर आध्यात्मिक होणे ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. अध्यात्म बहुतेक लोकांच्या जीवनात दूरवरची गोष्ट आहे, ते केवळ यामुळे की, बहुतेक लोक त्यांच्यावर लादल्या गेलेल्या शिक्षणाने जगत आहेत आणि त्यांच्या स्वाभाविक बुद्धिमत्तेने नाही. जर तुम्ही स्वतःहून गोष्टी समजून घेतल्या, तर जेव्हा तुम्ही जीवनाबद्दल विचार करायला आणि जीवनाकडे पाहायला सुरुवात करता, तेव्हा जीवनाबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आतमध्ये वळण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. स्वाभाविकपणे पाहण्यासाठी एकमेव जागा ही आतमध्ये आहे. केवळ धर्मग्रंथ किंवा या किंवा त्या व्यक्तीने काय म्हटले ते ऐकले तरच तुम्ही आत वळता असे नाही. जर तुम्ही त्यापैकी काहीही वाचले नाही, तर जेव्हा तुम्ही जीवनाबद्दल विचार करायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही जीवनाकडे पाहायला सुरुवात करता, तेव्हा पाहण्याची जी एकमेव स्वाभाविक जागा आहे, ती म्हणजे आत.

एक दिवस असे घडले, एका महिला जी विद्यापीठात मोठी प्राध्यापिका होती, तिने स्वतःसाठी एक गुंतागुंतीचे घरगुती उपकरण विकत घेतले. ती ते घरी घेऊन आली, तिने सूचना वाचल्या आणि पॅकेजमध्ये आलेले तुकडे एकत्र करण्याचा खूप प्रयत्न केला, पण करू शकली नाही. तर तिने ते सर्व भाग तसेच सोडले आणि कामावर गेली. जेव्हा ती संध्याकाळी परत आली, तेव्हा तिला आश्चर्य वाटले की, उपकरण व्यवस्थित जोडलेले होते आणि आधीच वापरलेले होते. तिने मोलकरणीला बोलावले आणि विचारले, "हे कोणी दुरुस्त केले?" मोलकरणी म्हणाली, "मी केले." तिला विश्वास बसला नाही. ती म्हणाली, "तू हे कसे केलेस?" मग मोलकरणी म्हणाली, "जेव्हा तुम्हाला वाचता आणि लिहिता येत नाही, तेव्हा तुम्हाला तुमचा मेंदू वापरावा लागतो."

तर आपण आपल्या मुलांना मेंदू कसा वापरावा हे शिकवले पाहिजे, फक्त वाचणे आणि लिहिणे नाही. वाचणे आणि लिहिणे महत्त्वाचे आहे, पण तुमचा मेंदू वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. अनेक सुशिक्षित लोक, जे त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी आहेत, ते स्वतःच्या जीवनात गोंधळलेले आहेत. ते जसे आहेत त्यावरून, हे अतिशय स्पष्ट आहे की, ते स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत त्यांचा मेंदू वापरत नाहीत. शिक्षणाने तुमची बुद्धिमत्ता उत्तेजित केली पाहिजे, ती काढून नाही टाकली पाहिजे. आज, जगभरातील शिक्षण शास्त्रज्ञ म्हणत आहेत की, जर एखादे मूल वीस वर्षांच्या औपचारिक शिक्षणातून जात आहे, तर त्याची सत्तर टक्के बुद्धिमत्ता परिवर्तन न होण्याइतकी नष्ट होते. याचा अर्थ तुम्ही पढतमूर्ख म्हणून बाहेर येत आहात, आणि मानवतेसाठी हा एक मोठा गैरवापर आहे, कारण जगाचे भविष्य केवळ या मुलांच्या मेंदूत आहे. आपण सुंदर गोष्टी तयार करणार आहोत की, या पृथ्वीवर अतिशय विध्वंसक बॉम्ब तयार करणार आहोत, हे फक्त यावर अवलंबून आहे की, एखाद्याची भावना आणि बुद्धिमत्ता किती चांगल्या प्रकारे समन्वयित आहेत. एखादा मानव किती चांगल्या प्रकारे समन्वयित आहे हे यावरून ठरते की, तो त्याची बुद्धिमत्ता किती चांगल्या प्रकारे वापरेल आणि शेवटी तो जगात काय तयार करेल.

जगातील सर्वात बुद्धिमान लोकांनी या पृथ्वीवरच्या सर्व हिंसाचारात योगदान दिले आहे. लोकांचा एक विशिष्ट भाग हा मुळात नेहमीच हिंसक राहिला आहे. सुरुवातीला, जेव्हा तो गुहेत रहात होता, तेव्हा त्याने दगडाने मारले, ते पाषाणयुग आहे; लोहयुग म्हणजे त्याने लोखंडाने मारले; कांस्ययुग म्हणजे त्याने कांस्याने मारले; आण्विक युग म्हणजे तो अण्वस्त्रांनी मारत आहे. काही लोक मुळातच हिंसक बनलेले आहेत, पण सध्या ज्या पातळीची हिंसा घडून येऊ शकते, ती घडून आली आहे, कारण जगातील सर्वोत्तम मेंदूंनी मानवतेला मारण्याचे सर्वात हिंसक मार्ग तयार करण्यासाठी काम केले आहे. जर जगातील बुद्धिमान्यांनी सहकार्य केले नसते, तर एखाद्या हिंसक माणसाने काठी किंवा दगडाने एकाला किंवा दोघांना मारले असते. पण केवळ जगातील बुद्धिमान्यांनी सहकार्य केले आहे म्हणूनच एक हिंसक माणूस लाखोंना मारू शकतो.

आपल्या स्वतःच्या कल्याणाविरुद्ध वळवलेली बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता नाही. बुद्धिमत्ता हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे, जो मानवाला मिळाला आहे, पण सध्या तो मानवतेसाठी एक शाप ठरला आहे, हे केवळ यामुळे की, मानव हा एक चांगल्या प्रकारे समन्वयित अस्तित्व म्हणून पुढे आलेला नाही. त्याने स्वतःमधील मानवाला विस्थापित केले आहे. ही बुद्धिमत्ता धोकादायक आहे. जर तुम्ही गाढवासारखे असता, तर तुम्ही जास्तीत जास्त हिंसा तुमचे दोन पाय लाथाडून कराल, अधिक काही नाही. पण आता मानवी बुद्धिमत्ता इतकी धोकादायक झाली आहे. जो आशीर्वाद ठरायला हवा होता, तो इतका मोठा शाप बनला आहे, आणि निश्चितपणे शिक्षण त्यात मोठी भूमिका बजावत आहे.

 खरेतर, हे जग लहान मुलांद्वारे मार्गदर्शित केले गेले, तर ते अद्भुत ठरेल, कारण ते इतर कोणापेक्षा जीवनाच्या जास्त जवळ आहेत. शेवटी, तुम्ही या पृथ्वीवर जे काही करू इच्छिता, ते केवळ मानवी कल्याणासाठी आहे. मानवी कल्याण म्हणजे मानवी आनंद. जर तुम्ही तुमच्या मुलांकडे आणि स्वतःकडे पाहिलेत, तर निश्चितपणे तुमची मुले तुमच्यापेक्षा खूप जास्त आनंदी आहेत. चोवीस तासांच्या कालावधीत ते तुमच्यापेक्षा जास्त आनंदासाठी सक्षम आहेत. जेव्हा हे असे आहे, तेव्हा मला सांगा की, जीवनासाठी सल्लागार कोण असले पाहिजे, तुम्ही की तुमचे मुलं? निश्चितपणे मुले. तुम्ही तुमच्या विचार आणि भावना यामुळे वाहून गेला आहात, पण तुमची मुले जीवनाच्या खूप जवळ आहेत. जर जगाने मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्याकडून शिकले, तर हे एक अतिशय सुंदर ठिकाण असेल.


- सद् गुरू

(ईशा फाऊंडेशन)