राहुल कुमार सैनीला २५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर सोडले

मडगाव : मुरगाव पालिकेच्या कचरा उचलण्याचे काम करणार्या कामगारात दोरी हरवण्याच्या कारणावरून भांडण झाले. राहुल कुमार सैनी व राम कुमार माझी यांच्यात भांडण होताना मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या राजेश माझी याच्यावर राहुल कुमारने दांड्याने हल्ला केला. जखमी राजेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी संशयित राहुल कुमार सैनी याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
मुरगाव पालिका मंडळाकडून बायणा येथे उपलब्ध करून दिलेल्या कामगारांसाठीच्या खोलीत कचरा गोळा करणारे कामगार वास्तव्यास होते. २५ मे २०२५ रोजी दोरी हरवल्याच्या किरकोळ कारणावरून राहुल कुमार सैनी (२५, मूळ बिहार) याचे राम कुमार माझी या बिहारमधील कामगारासोबत भांडण झाले. या दोघांच्या भांडणावेळी राजेश माझी याने दोघांची समजूत काढत मध्यस्तीचा प्रयत्न केला. यावेळी रागाच्या भरात संशयित राहुल कुमार सैनी याने खोलीतील लाकडी दांड्याने राजेश माझी याच्यावर हल्ला केला. यात राजेश याच्या डोक्याला मार बसला. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करत मुरगाव पोलिसांनी संशयित राहुल कुमार सैनी याला अटक केली होती.
दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाच्या अटी
संशयित राहुल याने दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने २५ हजारांचा वैयक्तिक बाँड व तेवढ्याच किमतीचे दोन हमीदार सादर करणे, मोबाईल, पत्ता तपास अधिकार्यांकडे देत चौकशीत सहकार्य करणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न न करणे, न्यायालयाच्या परवानगीविना राज्याबाहेर न जाणे, सर्व सुनावणींना उपस्थित राहणे, अशा अटीशर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.