कुडतरीतील महिलेला एक लाखाचा गंडा, गुन्हा नोंद

मडगाव : कुडतरी येथील लतोया क्रिता सिक्वेरा कार्व्हालो या महिलेने पतीने पाठवलेली एका एपीके लिंकवर क्लिक केले व तिचा मोबाईल हॅक झाला. यानंतर अज्ञाताने महिलेच्या दोन बँक खात्यातून एक लाखांचे ऑनलाईन पद्धतीने गिफ्ट व्हाउचर खरेदी करत फसवणूक केली. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरोल रॉड्रिग्ज यांना परिवहन अॅपशी निगडीत एक एपीके लिंक आढळून आली. त्यांनी सदर लिंक पत्नी लतोया कार्व्हालो यांना पाठवली. कार्व्हालो यांनी ही लिंकवर क्लिक केली असता मोबाईल हॅक करण्यात आला. यानंतर अज्ञाताने मोबाईलवरून तक्रारदार लतोया यांच्या बँक ऑफ बडोदाच्या बचत खात्यातून ५० हजार काढले, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून ५० हजार रुपयांच्या रकमेतून अॅमेझॉन पेवर गिफ्ट व्हाउचर खरेदी करत १ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.