सनसेट पॉईंटवरील घटनेतील संशयितांना ७५ हजारांच्या बाँडवर मुभा

मडगाव : बेतूल सनसेट पॉईंटवर कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अनुप कावरेकर व साईराज नाईक यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी संशयित संदीप तिर्की (३०) व समीर तिर्की (२१, मूळ झारखंड) यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे.
कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या दोन कॉन्स्टेबलना १६ ऑगस्ट २०२५ रोजी बेतूल येथील सनसेट पॉईंटवर मारहाणीची घटना घडली होती. बेतूल ओएनजीसीतील दोन कर्मचारी बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या शोधासाठी कुंकळ्ळी पोलीस कॉन्स्टेबल अनुप कावरेकर व साईराज नाईक हे गेले होते. ते सनसेट पॉईंटवर पोहोचले असता संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना जाण्यास सांगितले होते. मात्र, ते त्यानंतरही न जाता त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलांवर दगड फेकून मारले, त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात अनुप कावरेकर याच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या.
यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित जेबियार डंग (२१, रा. सध्या वार्का, मूळ झारखंड), सुरेश हरिया (२१), राहुल किसन (२३), अमित लोहरा (२५, रा. सध्या बेतूल, मूळ झारखंड) यांच्यासह संदीप तिरके (३०) व समीर तिरके (२१) अशा सहाजणांविरोधात गुन्हा नोंद करत अटक केली होती. संशयित समीर व संदीप तिर्की यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
७५ हजारांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर
दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने संशयितांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयितांना ७५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच किमतीचा एक स्थानिक हमीदार सादर करणे, तपासात सहकार्य करणे, पुरावे नष्ट न करणे, कुंकळ्ळी पोलिसांत दहा दिवस हजेरी लावणे, न्यायालयातील सुनावणीला हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीविना राज्याबाहेर जाऊ नये, अशा अटीवर दोन्ही संशयितांना जामीन देण्यात आला आहे.