सुकूर पर्वरी खुनी हल्ला प्रकरण

म्हापसा : सुकूर पर्वरी येथील खूनी हल्ला प्रकरणी संशयित आरोपी दिनेश दुर्गाप्पा मल्लीनमणी व संतोष दुर्गाप्पा मल्लीनमणी (रा. २० कलमी वसाहत, सुकूर) या सख्ख्या भावांवर आरोप निश्चितीचे आदेश मेरशी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दिले आहेत.
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३२३, ३२४, ५०६, ३०७ व ३४ कलमांतर्गत आरोप निश्चित करण्यासाठी प्रथमदर्शी पुरावे असल्याचे नमुद करून न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी हा आदेश दिला आहे. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील कोलेमन रॉड्रिग्ज तर आरोपींच्यावतीने अॅड. मायकल नाझारेथ व सिमरन पोखरे यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, खुनी हल्ल्याची घटना १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान सुकूर पर्वरी येथील स्मशानभूमीजवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली होती. संशयित आरोपी दिनेश मल्लीनमणी व संतोष मल्लीनमणी यांना पर्वरी पोलिसांनी ७ डिसेंबर २०१९ रोजी अटक केली होती.
हा हल्ला वैयक्तिक वादातून घडला होता. याप्रकरणी श्रीकृष्ण उर्फ बालकृष्ण नाईक (रा. सुकूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपींनी फिर्यादी श्रीकृष्ण व त्याचे मित्र संदीप आर्य, श्याम नाईक आणि रवी पडियाग यांना लाथा बुक्क्यांनी व बिअरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करणार्या फिर्यादींचा भाऊ सुरेश नाईक याच्यावर सुरी केला. शिवाय श्याम नाईक याच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली होती.
या भांडणात दोघांचाही रक्तस्त्राव झाला होता. जखमींवर नंतर गोमेकॉत उपचार करण्यात आले. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाळणी यांनी गुन्हा नोंदवून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.