उत्सवात आयोजित गायकांच्या मैफिलींनाही उत्तम प्रतिसाद

भायली पेठ-डिचोली येथे देवीच्या पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : येथील सुप्रसिद्ध ‘नवा सोमवार’ उत्सव भाविकांच्या तुडुंब गर्दीत उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. गावकरवाडा येथील देवींची पालखी मिरवणूक वाजत गाजत भाविकांच्या उपस्थितीत मध्यरात्री मंदिरात आली. आतील पेठ मंदिरातील देवींची पालखी मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत वडाचा वाडा भायली पेठमार्गे आतील पेठ श्री शांतादुर्गा मठ मंदिरात आल्यानंतर मंगळवारी दुपारी उत्सवाची सांगता झाली.
उत्सवात ख्यातनाम गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात दर्जेदार गाणी सादर करून उपस्थित संगीत प्रेमींकडून वाहवा मिळवली. श्री शांतादुर्गा मंदिर परिसर गावकर वाडा तसेच रवळनाथ मंदिर परिसर, आतील पेठ मंदिर परिसर, व गुरु फंट ट्रस्ट सभागृह, भायली पेठ परिसरात वेगवेगळ्या गायकांच्या चार मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. भाविकांनी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरली होती.
सोमवार उत्सव झाल्याने आता दर सोमवारी श्री शांतादुर्गाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. ग्रामस्थ, गावकर मंडळ, तसेच बाजारकर दहा जण मंडळातर्फे उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डिचोलीचे वाहतूक पोलीस निरीक्षक विजय राणे व सहकाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेचे उत्तम प्रकारे नियोजन केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेटये, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी आमदार ग्लेन टिकलो, तसेच राजकीय, सामाजिक व वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.