पोलिसांच्या पाठलागानंतर दरोडेखोर पळाले

पैंगीण : सोमवारी रात्री काणकोण (Canacona) येथील मुख्य बाजार, चावडी येथील प्रवीण वेर्णेकर आणि कुटुंबीयांच्या एस एम ज्वेलर्स या निवासी दुकानात (Jewellery Shop) दरोडा टाकण्याचा प्रयत्न काणकोण पोलिसांच्या (Goa Police) सतर्कमुळे फसला. पोलिसांनी वेळे वर उपस्थिती लावून अज्ञातांचे प्रयत्न उधळून लावले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओळख पटू नये म्हणून तोंडावर मुखवटा घालून आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम मुख्य गेट तोडले आणि समोरचा दरवाजा बंद केला.
कुणी लक्ष देऊ नये म्हणून त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे लावला. एकूण पाच जण होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी दिली.
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी वरीलसंदर्भात माहिती दिल्यावर, काणकोणचे पोलीस निरीक्षक हरीश राऊत देसाई दोन पीएसआय आणि दोन पोलिस कॉन्स्टेबलसहीत घटनास्थळी दाखल झाले.
दरोडेखोरांना पळून जाताना पाहून त्यांनी त्यांच्यामागे धाव घेतली. त्यांनी जुन्या पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या शेतातून पळ काढला.
त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी पोलीस पथके तयार करून दरोडेखोर पळून गेलेल्या मार्गावर व लगतच्या मार्गांवर पाठवून शोध घेतला.
पोलिसांनी श्वान पथक मागवून तपास सुरू केला. मात्र, अद्याप धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलीस निरीक्षक हरीश राऊत देसाई तपास करीत आहेत.
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल यशवंत देसाई व जगदीश गावकर यांच्या सतर्कतेमुळे दरोडा उधळला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.