मुख्यमंत्री : साखळीत हायस्कूलना बुद्धिबळ पटाचे वितरण

अभिजीत खुंटे व सभागृहातील विद्यार्थी यांच्यात झालेल्या सामन्याचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : तब्बल २३ वर्षांनंतर भारतात फिडे विश्वचषक आयोजित करण्याचा योग आला. या स्पर्धेचे एकमेव ठिकाण म्हणून गोवा राज्याची निवड झाली, ही समस्त गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या विश्वचषकामुळे गोव्याची प्रतिमा उंचावली. विश्वचषकामुळे सुमारे ६३ देशांचे स्पर्धक गोव्याच्या भूमीत सहभागी झाले असून त्याचा लाभ गोव्यातील अनेक लहान-मोठ्या बुद्धिबळपटूंना झाला आहे. या विश्वचषकानंतर बुद्धिबळाचे वातावरण कायम राहाणे आवश्यक आहे. म्हणूनच क्रीडा खात्यातर्फे बुद्धिबळ खेळासाठी योग्य स्पर्धा, शिबिरे, मार्गदर्शन व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फिडे विश्वचषकच्या निमित्ताने साखळी येथील रवींद्र भवनात संलग्नित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी, फिडे विश्वचषकाचे कार्यकारी सचिव लुकास, बुद्धिबळातील ग्रँडमास्टर अभिजीत खुंटे, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे व इतर उपस्थित होते.
बुद्धिबळ हा वैचारिक खेळ असून या खेळात वैचारिक दृष्टी व चातुर्य लागते. गोव्यात आयोजित फिडे विश्वचषकाने गोव्याची प्रतिमा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. साखळीसारख्या शहरात बुद्धिबळ पुढे आणणे ही मोठी बाब असून या विश्वचषकातून गोव्यातील अनेक बुद्धिबळपटूंना भविष्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची प्रेरणा निर्माण होणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.
या कार्यक्रमात साखळी व परिसरातील हायस्कूलना बुद्धिबळ पट व किटचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले. स्वागत पर भाषणात संचालक अजय गावडे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
डोळ्यांवर पट्टी बांधून खुंटेंच्या बुद्धिबळ पटावर चाली
भारताचे ग्रँडमास्टर तथा भारतीय महिला बुद्धिबळ प्रशिक्षक अभिजीत खुंटे यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून रवींद्र भवनच्या सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत बुद्धिबळ सामना खेळला. या सामन्याचा शुभारंभ पहिली चाल खेळत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सभागृहात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धी चातुर्याने या सामन्यात चाली खेळल्या, तर डोळ्यांवर पट्टी बांधूनही अभिजीत खुंटे यांनी सहज या सर्व चालींवर मात करून सभागृहातील सर्वांनाच चेकमेट केले व सामना लीलया जिंकला.