सिद्दीकी खानची ब‍ेकायदा अटकेविरुद्धची याचिका फेटाळली

जमीन हडप प्रकरण : भूखंड घोटाळ्यातील आरोपीला उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th November, 11:57 pm
सिद्दीकी खानची ब‍ेकायदा अटकेविरुद्धची याचिका फेटाळली

म्हापसा : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या बेकायदा अटकेची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायपीठाने गुरुवारी फेटाळून लावली. कोठडीतून पलायन केल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने सिद्दीकीला केरळमध्ये अटक केली होती, त्या अटकेला सिद्दीकीने आव्हान दिले होते.
न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायपीठाने सिद्दीकीने दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली आहे. एकतानगर, म्हापसा येथील जमीन हडप व्यवहार प्रकरणात तब्बल चार वर्षे फरार असलेल्या मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीतून अटक केली होती.
या अटकेनंतर सिद्दीकीने गुन्हा शाखेच्या कोठडीतून १३ डिसेंबर २०२४ रोजी आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल (बडतर्फ) अमित नाईक याच्या मदतीने पलायन केले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम (केरळ) पोलिसांच्या मदतीने सिद्दीकीला २१ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा अटक केली.
दरम्यान, जुने गोवा पोलिसांनी सिद्दीकी खान पलायन प्रकरणात सिद्दीकीच्या पत्नीसह, हजरतसाब बवन्नवार उर्फ हजरत अली आणि आयआरबी कॉन्स्टेबल (बडतर्फ) अमित नाईक यांनाही अटक केली होती.
अटकेविरुद्धची याचिका रद्द
सिद्दीकीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत २१ डिसेंबर रोजी झालेली आपली अटक बेकायदा असल्याचा दावा केला होता. त्याने आपली सुटका करावी आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत त्याची याचिका फेटाळून लावली.