बायणा दरोड्याचा मास्टरमाईंड 'गोलक'चा कारनामा वाचा...

वास्को: गोव्यातील बायणा येथे नुकत्याच झालेल्या सशस्त्र दरोड्याचा अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला असला, तरी या दरोड्यामागील सत्य ऐकून पीडित नायक कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या संपूर्ण दरोड्याचा 'मास्टरमाईंड' दुसरा तिसरा कोणी नसून, तो कुटुंबाचा अत्यंत विश्वासू आणि प्रसिद्ध आचारी (सेलेब्रिटी शेफ) सुरेश मलिक उर्फ गोलक निघाला आहे. ज्याला कुटुंबाने मित्र मानले, त्यानेच विश्वासघात करत घरात दरोडा घडवून आणला.
सुरेश मलिक उर्फ गोलक याचे सागर नायक यांच्या कुटुंबासोबतचे नाते केवळ कामगाराचे नव्हते, तर तो कुटुंबातील सदस्य बनला होता. सागर नायक यांनी आईस्क्रीम पार्लरच्या शेजारी भेळपुरी/पाणीपुरीचा काउंटर सुरू केल्यावर गोलकची एंट्री झाली. तो फक्त भेळपुरी करणारा नव्हता, तर कॉन्टिनेन्टल, इंडियन, फ्रेंच आणि इटालियन कुझिनमध्ये पारंगत होता. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे गोलकने काही महिन्यांतच नायक कुटुंबाचा पूर्ण विश्वास जिंकला. सागर नायक आणि तो इतके घनिष्ट होते की ते मित्रांसारखे वावरत.
सेलेब्रिटी कनेक्शन: त्याने नायक कुटुंबाला सांगितले होते की, तो मुंबईत रणवीर सिंग, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन सारख्या अनेक मोठ्या सिनेस्टार्स सोबत पर्सनल शेफ म्हणून काम करत असे. पुराव्यासाठी त्याने त्यांच्यासोबतचे फोटोही दाखवले होते. गोलकने सागर नायक यांच्याकडे सुमारे ६-७ महिने काम केले. मात्र, काही महिन्यांपूर्वी कोणतेही ठोस कारण न देता तो अचानक मुंबईला निघून गेला. सागर नायक यांनी त्याला अनेकदा फोन करून परत येण्याची विनंती केली, पण गोलकने ती मान्य केली नाही.

यानंतर १८ नोव्हेंबरच्या पहाटे सागर नायक यांच्या फ्लॅटवर सहा ते सात दरोडेखोर दाखल झाले. दरोडेखोर किचनच्या खिडकीतून आत घुसले. यातील एक जण घरातल्या कानाकोपऱ्याची माहिती असल्यासारखा वावरत होता, आणि इतर सर्व जण त्याच्याच इशाऱ्यावर काम करत होते. त्यांनी सागर नायक यांच्या डोक्यावर लोखंडी सळीने प्रहार केला, तसेच पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले. नियोजनबद्धरित्या अवघ्या ३०-४० मिनिटांत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मोठा ऐवज घेऊन त्यांनी पळ काढला.

पोलिसांनी विविध पद्धतींनी तपास केला. मुळात इमारतीची खडान् खडा माहिती एखाद्या माहितीगारालाच असते. तिजोरीबद्दल विचारणा करणे, कारची चावी घेतल्यावर थेट त्याच कारसमोर जाणे, लोखंडी ग्रिल्स नसलेल्या किचनच्या खिडकीसमोर जाणे, या गोष्टी माहितीगारच करू शकतो, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी सागर नायक यांच्या आजी माजी कामगारांवर, तसेच इतर काहीजणांवर लक्ष केंद्रित केले होते. पोलिसांनी मोबाईलचा डम्प डेटा मिळवून त्याद्वारे तपास केला. आठ दिवसांत पोलीस यंत्रणा आणि इतर घटक सतत सागर नायक यांच्या संपर्कात होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी केली. नायक यांच्याशी निगडीत तब्बल ४० जणांची याकाळात चौकशी करण्यात आली. चौकशी समोर आलेल्या मुद्यांच्या आधारे पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केले आणि तपासाला मूर्त स्वरूप दिले. दरोडा घातल्यावर चोर मुंबईला कसे पळाले, हा प्रश्न आहे. ते एकत्रितपणे गेले की वेगवेगळे ? मुंबईला जाण्यासाठी त्यांनी रेल्वे, बस की आणखी कोणत्या मार्गाचा अवलंब केला हा पुढील तपासाचा भाग आहे.
सावध रहा, सतर्क रहा : पोलीस महासंचालकांचे आवाहन
दरम्यान काल सकाळी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली व राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची माहिती दिली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा, पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, टिकम सिंग वर्मा व अन्य अधिकारी उपस्थित होते. बायणा प्रकरणी कुटुंबीयांनी चोरीचा 'मास्टरमाईंड' असलेल्या कामगाराची पडताळणी केली नव्हती. अनेक लोक आपल्या भाडेकरूची किंवा कामगाराची पडताळणी करत नाहीत. यामुळे अशी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वेळ लागतो. सर्वांनी आपले भाडेकरू तसेच कामगारांची पडताळणी करणे आवश्यक आहे. पोलीस आणि सामान्य जनतेत संवाद असावा, म्हणून विविध उपाययोजना आहेत. यापुढे त्या अधिक प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत, तसेच रात्रीच्या वेळी नाकाबंदी देखील वाढवली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संध्याकाळी या दरोडेखोरांना गोव्यात आणण्यात आले. तेव्हा सागर नायक यांच्या पायांखालून जमीन सरकली. त्यांनी कल्पनाही केली नसेल असे सत्य त्यांच्या समोर ऊभे ठाकले होते. या दरोड्याचा मास्टर माइंड चक्क सुरेश मलिक उर्फ गोलक निघाला. ज्याला कुटुंबाने विश्वासाने त्यांच्यात सामावून घेतले त्यानेच असा विश्वास घात करावा हे न पटण्यासारखेच आहे. सागर यांना या गोष्टीचे प्रचंड दुख झाले. गोलकने इतरांना सांगू हे घडवले असते तरी चालले असते, पण तो स्वतः या दरोड्यामध्ये सहभागी होता. त्यानेच सर्वांना घरातील कानाकोपऱ्याची माहिती पुरवली होती. मनातील खंत व्यक्त करताना काल सागर नायक हवालदिल झाले होते. पण कुटुंबावरील संकट टळले याचे समाधान देखील त्याच्या डोळ्यात दिसत होते. भाडेकरू पडताळणी न करणे ही क्षुल्लक गोष्ट कशी जीवाचा ठाव घेऊ शकते हेच या घटनेतून स्पष्ट होते. सावध रहा, सतर्क रहा हाच संदेश गोवा पोलिसांनी सर्व गोंयकरांना दिला आहे.