५ लाखांचे नुकसान, दोन युवती जखमी

म्हापसा: रेवोडा येथील बीएनएफ रेसिडेन्सी (BNF Residency) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला आज पहाटे आग लागली. या घटनेत २३ आणि २५ वर्षांच्या दोन युवती किरकोळ जखमी झाल्या असून, धुरामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता. ही आग एअर-कंडिशनिंग युनिटमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आग लागली त्यावेळी दोन्ही युवती खोलीत झोपलेल्या होत्या. आजूबाजूच्या सतर्क शेजाऱ्यांनी प्रसंगावधान राखून धाडस दाखवले आणि दोन्ही युवतींना फ्लॅटमधून सुखरूप बाहेर काढले. या बचावकार्यात एका स्थानिक नागरिकालाही किरकोळ दुखापत झाली. जखमी झालेल्या दोन्ही युवतींना तातडीने म्हापसा जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
म्हापसा अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत फ्लॅटमधील वस्तू मोठ्याप्रमाणात जळून खाक झाल्या असून, प्राथमिक अंदाजानुसार ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोलवाळ पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक सनी काणेकर यांच्या नेतृत्वाखाली या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.
