सामान्यांना त्यांचा हक्क मिळत असेल तर विरोधकांच्या पोटात का दुखते ? मुख्यमंत्र्यांचा सवाल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
03rd December, 04:50 pm
सामान्यांना त्यांचा हक्क मिळत असेल तर विरोधकांच्या पोटात का दुखते ? मुख्यमंत्र्यांचा सवाल

पणजी: 'माझे घर' योजना राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या नावावर घर होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. घर नावावर होऊन प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळत असतील तर विरोधकांच्या पोटात नेमके कशासाठी दुखत आहे, असा प्रश्न उपस्थित करून प्रचारादरम्यान विरोधकांना हे विचारण्याचे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

खोर्ली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या प्रचार शुभारंभावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार राजेश फळदेसाई आणि उमेदवार सिद्धेश नाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झेडपीत भाजपला मत देण्याचे आवाहन

राज्यात सध्या 'डबल इंजिन' सरकार कार्यरत आहे. आता दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवून हे सरकार 'ट्रिपल इंजिन' होणे गरजेचे आहे. यासाठी मतदारांनी २० डिसेंबर रोजी भाजप उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार पैसे कमवण्यासाठी राजकारणात आलेले नाहीत, तर ते जनतेची सेवा करण्यासाठी आले आहेत. याच भावनेतून 'गृह आधार' आणि 'लाडली लक्ष्मी' यांसारख्या कल्याणकारी योजना सुरू झाल्या आहेत. गरीब कुटुंबांच्या खात्यात दर महिन्याला किमान दोन हजार रुपये जमा होत आहेत. कल्याणकारी योजना वेगाने राबवण्यासाठी आणि राज्याच्या विकासासाठी भाजपकडे सत्ता सोपवावी, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांवर टीका

यावेळी आमदार राजेश फळदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल वेगाने सुरू असून, तीन नव्हे तर ५० विरोधी पक्ष एकत्र आले तरी भाजपला कोणताही फटका बसणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. खोर्लीचे उमेदवार सिद्धेश श्रीपाद नाईक हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उमेदवार सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरणीच्या पाया पडून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. भाजपमुळे आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली असून, यापुढेही जनसेवा करत राहू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा