
पणजी : भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी जिल्हा पंचायत निवडणुकीत (Zilla Panchayat Election) विरोधी पक्षांची युती होणे आवश्यक आहे. युती होणे आता सर्वस्वी काँग्रेसच्या (Congress) हातात आहे. काँग्रेसने योग्य प्रकारे पावले टाकायला हवीत, असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष विजय सरदेसाई (Mla Vijay Sardesai) यांनी म्हटले आहे.
सुरवातीला विरोधी पक्षांच्या युतीसाठी मीच पुढाकार घेतला होता. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी या तिन्ही पक्षांची एकदाच बैठक झाली होती. यानंतर काँग्रेस व आरजी या दोघांमध्येच चर्चा झाली. त्यांचे का फिस्कटले? याची मला माहिती नाही. तरीही तिन्ही पक्षांची युती मला हवी आहे, असे ते म्हणाले.
निवडणूक जवळ ठेपल्याने पक्ष म्हणून काही तरी तयारी करायलाच हवी. यासाठी गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांचा प्रचार सुरू असला तरी युतीबाबत चर्चा करण्यास काहीच हरकत नाही. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड या दोन पक्षांची पूर्वीपासून युती आहे. ती तोडायची असल्यास काँग्रेसने तसे स्पष्ट करावे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची युती झालेली गोवा फॉरवर्डला हवी आहे. इतर पक्षांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.