मुंबई उ.न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, वाफोली, इन्सुली आणि गोवा सीमाभागात गेल्या दोन महिन्यांपासून वावरत असलेल्या व सध्या गोव्यात परतलेल्या 'ओंकार' हत्तीच्या भवितव्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ओंकारच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या प्राणीप्रेमी आणि कार्यकर्त्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
उच्चाधिकार समितीने स्पष्ट केले आहे की, ओंकार हत्तीला खासगी मालकीच्या 'वनतारा' प्रकल्पाकडे पाठवता येणार नाही. त्याऐवजी, त्याला महाराष्ट्र वनविभागाच्या ताब्यातील सुरक्षित आणि सरकारी व्यवस्थापन असलेल्या अधिवासात ठेवणे बंधनकारक असेल.
खासगी प्रकल्पाला नकार देण्यामागील निकष
समितीने खासगी प्रकल्पाला नकार देताना स्पष्ट केले की, ओंकारला पकडल्यानंतर ज्या ठिकाणी ठेवले जाईल, ते केंद्र शासकीय (सरकारी) असणे अनिवार्य आहे. त्या केंद्रात सुरक्षिततेचे आवश्यक निकष, प्राथमिक आरोग्यसेवा, प्रशिक्षित पशुवैद्यकीय कर्मचारी तसेच २४ तास वनपथकाची निगराणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या निकषांनुसार कोल्हापूर वनविभाग क्षेत्रात एकही सरकारी बचाव सुविधा उपलब्ध नसल्याचे विभागाच्या वतीने समितीसमोर सांगण्यात आले आहे. यामुळे ओंकारला पकडल्यानंतर नेमके कुठे ठेवायचे, हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. यापूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचने ओंकारला खासगी वनतारा प्रकल्पाकडे हलवण्याचा आदेश दिला होता, परंतु उच्चाधिकार समितीने तो आदेश रद्द करून सरकारी अधिवासाचा निर्णय कायम ठेवला आहे.

कोल्हापूर वनविभागाची पुनर्विचार याचिका
उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओंकार प्रेमींना दिलासा मिळाला असला तरी, कोल्हापूर वनविभागाने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या वादाला नवी दिशा मिळाली असून, या याचिकेवरील पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.
ओंकार सध्या गोव्यात
दरम्यान, तब्बल ६३ दिवस सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी वास्तव्य करून अखेर ओंकार परवाच फकीरपाटा, पत्रादेवी मार्गे गोव्यात दाखल झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याने तोरसे, पेडणे येथे बस्तान हलवले आहे. ओंकार दिवसा नदीत पोहणे, रानात फिरणे, गवतचारा खाणे असे उद्योग करतो आणि सायंकाळी लोकवस्तीत दाखल होतो. कालच तोरसे भागातील विद्यार्थ्यांनी ओंकारला घाबरून शाळा बुडवल्याची माहिती आहे. ओंकारच्या या वावरामुळे सध्या या परिसरात धास्तीचे वातावरण पसरले आहे.