पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युकेमध्ये जाणाऱ्या गोमंतकीयांची संख्या कमी होतेय : कारणे अनेक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
03rd December, 03:29 pm
पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युकेमध्ये जाणाऱ्या गोमंतकीयांची संख्या कमी होतेय : कारणे अनेक

पणजी : नोकरी मिळणे सुलभ व्हावे यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट (Portuguse Passport) घेऊन यूके मध्ये (UK) जाणाऱ्या  गोमंतकीयांची (Goans) संख्या आता कमी होऊ लागली आहे. यापूर्वी अनेक गोमंतकीय नोकरी, व्यवसायासाठी युरोपमध्ये जात होते. त्यासाठी भारतीय नागरिकत्व (Indian Citizceship)  त्यागून पोर्तुगीज नागरिकत्व घेतले जात होते.  युरोपियन युनियन व विशेषत: युनायटेड किंग्डममध्ये (यूके)  नोकरी, व्यवसायासाठी वास्तव्य करून राहणे सुलभ व्हावे, यासाठी भारतीय नागरिकत्व त्यागून पोर्तुगीज पासपोर्ट घेतला जात होता. 

आता पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युके, युरोपमध्ये जात असलेल्या गोमंतकीयांची  संख्या कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. सहज नोकरी मिळवण्यासाठी यूके आता पूर्वी सारखे स्थान राहिलेले नाही. नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रक्रिया किचकट बनली आहे. पूर्वीसारख्या सोयीही आता उपलब्ध नाहीत. पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यासाठी आता चार वर्षे लागतात.

पूर्वी एक वर्षापेक्षा कमी कालावधीत नागरिकत्व मिळत होते. कडक नियम व कागदपत्रांची कडक तपासणी. पोर्तुगीज नागरित्वासाठी प्रक्रिया करताना भारतीय अधिकारिणीकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी घेतला जाणारा अवधी. कागदोपत्री प्रक्रिया जास्त कठीण बनणे, आयरलॅंड, नेदरलॅंड, जर्मनी यासारख्या देशांत जाण्यासाठी प्राधान्य, इत्यादी कारणांमुळे ही संख्या कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

एकूण आकडेवारी पाहिल्यास पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युरोपीयन देशांत जाणाऱ्या गोमंतकीयांची संख्या बरीच कमी होत आहे. २०१५ पासून  सुमारे २६ हजार गोमंतकीयांनी त्यांचे भारतीय पासपोर्ट सोडले.  मात्र, आता ही संख्या एकदम कमी झाली आहे.  २०२२ मध्ये १,२६५ गोमंतकीयांनी भारतीय पासपोर्ट सोडले. २०२१ मध्ये २,८३५ तर २०१५ ते २०१९ दरम्यान दरवर्षी सुमारे ३,५०० ते ४,१०० जणांनी भारतीय पासपोर्ट  सोडले. तथापि, या संख्येत दूतावासासमोर भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांचा समावेश नाही.

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज येत आहेत. मात्र, त्यात पू्र्वीसारखी तत्परता नाही.  पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यासाठी व भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी दिवसाला सुमारे १० ते १२ अर्ज येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.अनेक निरीक्षकांच्या मते, ‘ब्रेक्झिट’मुळे निर्णायक ‘ब्रेक’ आला आहे. पोर्तुगीज नागरिकत्व असल्यास पूर्वी यूकेमध्ये चांगली मागणी व हमी होती. मात्र, आता युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर पूर्वीसारखी मागणी राहिलेली नाही.

पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्यास मदत करणारे सल्लागार डुआर्ट फर्नांडिस म्हणाले की, पूर्वी एका वर्षाच्या कालावधीत नागरिकत्व मिळायचे. मात्र, आता चार वर्षे लागत आहेत. पूर्ण नागरिकत्व मिळवण्यासाठीचे नियम अधिक कडक झाले आहेत. व्यावसायिक ब्रुनो गोमिंडेस यांचे म्हणणे आहे की,  नागरिकत्व मिळवण्यास होणारा विलंब नवीन निर्बंधांमुळे नाही तर भारत सरकारच्या कागदपत्रांच्या पडताळणीच्या मंद गतीमुळे आहे.

पोर्तुगीज अधिकारी नियमितपणे प्रत्येक अर्जदाराकडून स्पष्टीकरण मागतात आणि जलद प्रक्रिया करतात. तथापि, त्यांनी सांगितले की अर्ज वेळेवर पूर्ण होतील याची खात्री करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी या पडताळणीला त्वरित प्रतिसाद दिला पाहिजे.  जन्म आणि विवाह पडताळणी जलद करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा