खा. विरीयातो फर्नांडिस यांच्या अतारांकित प्रश्नाला लोकसभेत दिले लेखी उत्तर

पणजी: गोव्यात आण्विक ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याबाबत सध्या तरी कोणताही प्रस्ताव नाही. मात्र, व्यवहार्य प्रस्ताव आल्यास भविष्यात अशा प्रकल्पांवर विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय कार्मिक खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. आज बुधवारी या विषयावर दक्षिण गोव्याचे खासदार विरीयातो फर्नांडिस यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता.
खासदार फर्नांडिस यांनी भविष्यात गोव्यात अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव आहे का? यासाठी राज्य सरकारला विश्वासात घेतले आहे का? राज्य सरकारने यासाठी मान्यता दिली आहे का? प्रकल्पासाठी जागा निवडण्यात आली आहे का? प्रकल्प ऊर्जा निर्मितीसह लष्करी कामांसाठी वापरला जाईल का? आणि प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन केले आहे का? असे अनेक प्रश्न विचारले होते. यावर, गोव्यात सध्या कोणताही प्रस्ताव नसल्यामुळे अन्य प्रश्नांची उत्तरे देता येत नसल्याचे उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या विधानावर वाद
याआधी मे महिन्यात केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या गोवा भेटीदरम्यान राज्यात आण्विक ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. गोव्यात आण्विक, जलविद्युत, सौर अथवा अन्य कोणताही वीजनिर्मिती प्रकल्प नसल्यामुळे त्यांनी आण्विक ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव असल्याचे मत व्यक्त केले होते.
या विधानावर राज्यातील विरोधी पक्षांनी मोठी टीका केली होती. गोव्यासारख्या निसर्गसंपन्न राज्यात आण्विक ऊर्जा प्रकल्पाची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा हे छोटे राज्य असल्यामुळे येथे असा प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय मंत्री खट्टर यांनी वीजपुरवठ्याबाबत काही पर्याय सुचवले होते, त्यामध्ये आण्विक वीज प्रकल्पाचा समावेश होता. मात्र, गोव्याची भौगोलिक स्थिती पाहता असा प्रकल्प गोव्यात होऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.