मळा येथील युवकाचा मृत्यू स्मार्ट सिटीच्या कामामुळे नाही!

मानवाधिकार आयोगाचा निष्कर्ष

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19 hours ago
मळा येथील युवकाचा मृत्यू स्मार्ट सिटीच्या कामामुळे नाही!

पणजी : स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना मळा परिसरात १ जानेवारी २०२४ रोजी आयुष हळर्णकर (वय २१) या युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाने दिलेला अहवाल समोर आला आहे. या प्रकरणात मानवाधिकारांचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

स्मार्ट सिटीची कामे सुरू असताना १ जानेवारी २०२४ रोजी मळा येथे आयुष हळर्णकर या २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. स्मार्ट सिटीकडून देण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तसेच अपघात स्थळाचे छायाचित्र, पोलिसांचा तपास यानुसार कामाच्या ठिकाणी बॅरिकेट, बोर्ड लावण्यात आले होते. हा अपघात दुचाकी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला होता. यामुळे या प्रकरणी मानवाधिकाराचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अपघात झाल्यावर मानवाधिकार आयोगाने याविषयी सुमोटो पद्धतीने दखल घेतली होती. यामध्ये स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता, क्रिएटिव्ह एंटरप्राईजेस, पणजी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आणि रुपेश हळर्णकर यांना प्रतिवादी करण्यात आले होते. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १ जानेवारी २०२४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास झाला होता. यावेळी चालकाने हेल्मेट घातले नव्हते. त्याने ब्रेक न मारल्याने तो वेगाने जाऊन बॅरिकेट मोडून खड्ड्यात जाऊन पडला. तसेच चालकाने मद्यपान केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम क्रिएटिव्ह एंटरप्राइजेस यांना दिले होते. अपघात झाल्यानंतर खात्याने या एंटरप्राईजेसला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या एंटरप्राईजेसने कामाच्या ठिकाणी सुरक्षा बोर्ड तसेच बॅरिकेट्स लावल्याचे छायाचित्र पुरावा म्हणून सादर केले होते. वरील सर्व बाजूंचा विचार करून आयोगाने याप्रकरणी मानवाधिकारांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मद्यपान केल्याचे पोलीस तपासात उघड

युवकाने ब्रेक न मारल्याने तो वेगाने जाऊन बॅरिकेट मोडून खड्ड्यात जाऊन पडला. तसेच चालकाने मद्यपान केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते.