ओमान, यूएईसह ६ देशांमध्ये गोमंतकीय कार्यरत : केंद्रीय परराष्ट्र व्यवहार (राज्यमंत्री) कीर्ती वर्धन सिंह यांचे लेखी उत्तर

पणजी: गोव्यातून नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने सुमारे सात हजार गोमंतकीय (Goemkars) आखाती देशांमध्ये (gulf countries) स्थलांतरित झाले आहेत आणि तेथील सहा प्रमुख देशांमध्ये कार्यरत आहेत. गोमंतकीयांसह इतर स्थलांतरित भारतीयांना आखाती देशांमध्ये सुरक्षा आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या असल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.

राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले की, आखाती देशांमध्ये भारतीय नागरिकांचे संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण याला भारत सरकार उच्च प्राधान्य देते.
स्थलांतरितांसाठी सरकारी योजना
स्थलांतरित भारतीय कामगारांसाठी सुरक्षित आणि सुव्यवस्थित स्थलांतर प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत प्रवासी भारतीय विमा योजना (Pravasi Bharatiya Bima Yojana - PBBY): या योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगारांना सुरक्षा कवच पुरवले जाते. प्रस्थानपूर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण (Pre-Departure Orientation and Training - PDOT) ही मोहीम स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांना परदेशात व्यवस्थित राहण्याची आणि काम करण्याची सुविधा मिळावी यासाठी उपयुक्त आहे. या प्रशिक्षणातून त्यांना त्यांचे हक्क आणि सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते.
![]()
गोमंतकीयांची आकडेवारी
मंत्री सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००६-०७ पासून जून २०२५ पर्यंत प्रवासी भारतीय विमा योजनेअंतर्गत ८३.८८ लाख भारतीयांची नोंद झाली आहे, ज्यामध्ये ७,०८७ गोमंतकीय नागरिकांचा समावेश आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी स्थलांतर केलेल्या या गोमंतकीयांचा समावेश असलेल्या सहा प्रमुख आखाती देशांमध्ये ओमान, कतार, कुवेत, सौदी अरब, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) यांचा समावेश आहे.
