एड्स नियंत्रण संस्थेचा धक्कादायक अहवाल.

पणजी: गोव्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या दहा महिन्यांदरम्यान एकूण २३७ जणांना एचआयव्हीची (HIV) लागण झाली आहे. या बाधितांच्या वयोगटानुसार केलेल्या विश्लेषणानुसार, ३५ ते ४९ या वयोगटातील महिलांमध्ये एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण इतर कोणत्याही वयोगटापेक्षा सर्वाधिक आहे. राज्य एड्स नियंत्रण संस्थेने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

बाधितांची वयोगटानुसार आकडेवारी
एकूण २३७ बाधितांपैकी ९ गरोदर महिला वगळता उर्वरित २२८ बाधितांमध्ये १७३ पुरुष, ५४ महिला आणि एक तृतीयपंथी व्यक्तीचा समावेश आहे. महिला बाधितांमध्ये स्थिती पाहिल्यास एकूण ५४ महिला बाधितांपैकी सर्वाधिक २५ महिला (४६.३%) या ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. त्यानंतर २५ ते ३४ वयोगटातील १६ महिला (२९.६%) बाधितांची संख्या अधिक आहे.
५० हून अधिक वर्षांच्या ११ महिला (२०.४%) बाधित आढळल्या, तर १५ ते २४ आणि १४ वर्षांखालील गटात प्रत्येकी एका महिलेला लागण झाली आहे.

पुरुष बाधितांमध्ये एकंदरीत स्थिती पाहिल्यास पुरुषांमध्ये १७३ पैकी सर्वाधिक ६७ बाधित (३८.७%) हे २५ ते ३४ वयोगटातील आहेत. त्यानंतर ३५ ते ४९ वर्षांचे ५४ पुरुष (३१.२%) आणि ५० हून अधिक वर्षांचे ३१ पुरुष (१७.९%) बाधित आहेत. १५ ते २४ वयोगटातील २७ पुरुष (११%) बाधित असून, १४ वर्षांखालील एका पुरुष व्यक्तीलाही लागण झाली आहे.

मागील काही वर्षांत ३५ ते ४९ वयोगटातील महिला बाधितांची संख्या कमी होत असताना, चालू वर्षात (२०२५) त्यात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येते. २०२० मध्ये एकूण बाधित महिलांपैकी ५६ टक्के या वयोगटातील होत्या. २०२१ मध्ये ५२ टक्के, २०२२ मध्ये ३७ टक्के, २०२३ मध्ये ३८ टक्के तर २०२४ मध्ये ३३ टक्के बाधित महिला या वयोगटातील होत्या या दहा महिन्यांच्या कालावधीत दोन महिलांना एड्सची (AIDS) लागण झाल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत गोव्यातत एड्समुळे वीस रुग्णांचा मृत्यू झाला, ज्यात पाच महिला रुग्ण होत्या.