
पणजी : काणकोण येथील चापोली धरण परिसरात झालेल्या भीषण अपघातात रविश राजेंद्र कोमरपंत (२४ वर्षे, राजबाग, तारीर) हा युवक ठार झाला. दिव्या ठाकूर व रिक्षित राज (२७ वर्षे) गंभीर जखमी झाले. या दोघांवरही हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत.
रिक्षित व दिव्या ही दोघेही रविश यांच्या थार वाहनाने (केए ०४ एनजी ०१११) रात्री चापोली धरण परिसरात गेले होते. रस्त्यावर असलेल्या एका वळणावर मध्यरात्रीनंतर ३ वाजता रविशचा गाडीवरील ताबा सुटला व बाजूच्या मोठ्या दगडाला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, चालकाच्या बाजूचा गाडीचा टायर सुटला. या अपघातात रविश जागीच ठार झाला. २७ वर्षीय रिक्षित राज व दिव्या ठाकूर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. तेथून रिक्षितला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. दिव्यावर मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीप्रमाणे, रक्षीत राज हा मूळ बंगळुरू, कर्नाटक येथील असून, राजबाग येथे एक हॉटेल भाड्याने चालवण्यासाठी घेतले आहे. त्याची मैत्रीण दिव्या मूळ गुजरात येथील आहे. रविश हा पर्यटक टॅक्सी मालक व चालक आहे. रविशच्या घरी त्याची आई एकटीच आहे. रविशच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.