
पणजी : लोणावळा (Lonavala) येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील (Goa) दोन पर्यटक युवक ठार झाले. अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे योगेश सुतार (२१ वर्षे) व मयूर वेंगुर्लेकर (२४ वर्षे) अशी आहेत. दोघेही गोव्यातील म्हापसा (Mapusa) येथील रहिवासी आहेत.
अपघातात ठार झालेले युवक पुणे जिल्ह्यातील (Pune District) लोणावळ्यात पिकनिकसाठी गेलेल्या १४ जणांच्या गटातील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील कार लायन्स पॉइंटजवळ वळणावर जात होती. त्यावेळी भरधाव वेगाने येत असलेल्या मिनी ट्रकला समोरून धडक बसली. धडक एवढी तीव्र होती की, कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. दोघेही युवक गंभीर जखमी झाले व कारमध्ये अडकले.
अपघाताचा आवाज ऐकून काही स्थानिक त्याठिकाणी आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. बचाव पथकाने येऊन दोन्ही युवकांना बाहेर काढले. मात्र, ते जागीच मृत्यू पावले होते. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन करून कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. लोणावळा पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.