
पणजी: जगप्रसिद्ध कोलवा समुद्रकिनाऱ्यावर (Colva Beach) भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा वाढला असून, बुधवारी एका रशियन महिला पर्यटकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

झिना (Zena) नामक ही रशियन पर्यटक महिला बुधवारी कोलवा समुद्र किनारी फेरफटका मारण्यासाठी आली असताना, एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डाव्या हाताचे एक बोट आणि मांड्यांना जखमा झाल्या. तिला तातडीने रुग्णालयात नेऊन इंजेक्शन देण्यात आले. माजोर्दा येथे वास्तव्यास असलेल्या झिना यांनी सांगितले की, कोलवा बीच खूप आवडत असल्याने त्या नियमितपणे येथे येतात. मात्र या घटनेमुळे त्या सध्या भयभीत झाल्या आहेत.

सरकारकडे तातडीने डॉग शॅल्टर उभारण्याची मागणी
झिना यांनी माध्यमांशी बोलताना, भटक्या श्वानांना मारण्याऐवजी त्यांच्यासाठी सरकारने डॉग शॅल्टर उभारावेत, अशी कळकळीची विनंती केली आहे. अशा डॉग शॅल्टर्समुळे या समस्येवर मानवी दृष्टिकोनातून कायमस्वरूपी तोडगा निघेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोलवा किनारपट्टीवर येणारे पर्यटक भटके कुत्रे आणि काही भागांत साचलेला कचरा आणि त्यामुळे येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे त्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
![]()
वाढत्या उपद्रवामुळे पर्यटन व्यवसायाला धोका
संध्याकाळनंतर समुद्रकिनारे आणि रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात नित्याचे झाले आहेत. केवळ कोलवा नव्हे, तर केळशीसारखे दक्षिणेकडील किनारे आणि हणजुण, वागातोरसारख्या, मोरजीसारख्या उत्तरेकडील लोकप्रिय समुद्रकिनारी देखील पर्यटकांना कुत्र्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गोव्यात २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या काळात भटक्या श्वानांनी चावा घेतल्याच्या ३७,१९७ घटनांची नोंद झाली आहे, ज्यातील बहुतेक घटना किनारपट्टीच्या भागात घडल्या आहेत. मात्र, गोवा ॲनिमल फेडरेशनचे (GAF) अध्यक्ष के. डी. रोव यांनी ही आकडेवारी फुगवलेली असल्याचे म्हटले आहे.

गोव्यात 'डॉग बाइट'ची आकडेवारी फुगली; रेबीज इंजेक्शनच्या चुकीच्या नोंदीमुळे आकडेवारीत मोठी तफावत; ९५% चावे पाळीव कुत्र्यांचे असल्याचे स्पष्ट
गोव्यात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची सरकारी आकडेवारी अत्यंत भीतीदायक वाटत असली तरी, ही संख्या अतिशयोक्त (Inflated) असून, प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव खूपच कमी आहे. सरकारी नोंदीमध्ये झालेल्या त्रुटींमुळे गेल्या तीन वर्षांतील 'डॉग बाइट्स'ची संख्या ३७,१९७ एवढी मोठी नोंदवली गेली, पण आकडेवारीच्या विश्लेषणातून सत्य वेगळेच समोर आले आहे.

आकडेवारी फुगण्याची दोन प्रमुख कारणे
१. इंजेक्शनची चुकीची गणना: रेबीज प्रतिबंधक उपचारासाठी रुग्णाला सामान्यतः ५ डोस (इंजेक्शन) दिले जातात. मात्र, रुग्णालयीन नोंदींमध्ये प्रत्येक इंजेक्शनचा डोस एक स्वतंत्र 'बाईट केस' म्हणून मोजला जातो. यामुळे वास्तविक आकडेवारी पाच पटीने फुगते. या त्रुटीनुसार दुरुस्ती केल्यास, गेल्या तीन वर्षांतील प्राणी चावल्याच्या एकूण घटना (फक्त कुत्रे नव्हे) ७,४३९ इतक्या येतात.

२. पाळीव कुत्रे विरुद्ध भटके कुत्रे: या ७,४३९ घटनांमध्ये ९५% चावे पाळीव कुत्र्यांनी (Pets) घेतलेले आहेत. म्हणजेच, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची प्रकरणे यापैकी केवळ ५% आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना गेल्या तीन वर्षांत केवळ ३७२ इतक्या आढळतात. याचा अर्थ, गोव्यात दरवर्षी सरासरी १२४ चावे होतात, म्हणजेच जवळपास दर तीन दिवसांनी १ चावा ही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची सरासरी आहे.

नोंदणी प्रक्रियेतील आणखी एक मोठी त्रुटी म्हणजे, 'डॉग बाइट' या श्रेणीत केवळ कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद ठेवली जात नाही. मांजरी, माकडे किंवा इतर कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास आणि त्यासाठी रेबीज इंजेक्शन दिल्यास, त्याची नोंदही 'डॉग बाइट' म्हणून केली जाते. या कारणांमुळे, ३७२ ही अंतिम संख्या देखील प्रत्यक्षात त्याहून कमी असण्याची शक्यता आहे.गोव्यात अंदाजे ५६,००० भटकी कुत्री असूनही, त्यांच्यामुळे होणाऱ्या चाव्याची आकडेवारी दर तीन दिवसांनी १ पेक्षाही कमी असेल, तर याचा अर्थ भटकी कुत्री आक्रमक नाहीत. आकडेवारी वाढवून दाखवल्याने लोकांमध्ये भटक्या प्राण्यांबद्दल अकारण भीती निर्माण होऊ शकते, असा निष्कर्ष या विश्लेषणामधून काढण्यात आला आहे.

समस्येवर उपाययोजना
पणजी महापालिकेचे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्याचे आणि प्राणी कल्याण कायद्यांबद्दल शिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, तज्ज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की, भुकेमुळे, प्रजननामुळे किंवा पूर्वीच्या गैरवागणुकीमुळे कुत्र्यांमध्ये आक्रमकता येते. नियमित आहार, निर्बीजीकरण (Sterilisation) आणि जनजागृतीमुळे ही समस्या कमी होऊ शकते.

विशेष म्हणजे, गोवा हे सलग पाच वर्षांहून अधिक काळ 'मानवी रेबीज मुक्त' (Rabies-Controlled State) असलेले देशातील पहिले राज्य आहे. तरीही, भटक्या श्वानांची वाढती संख्या आणि आक्रमकता यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे तातडीने आश्रयस्थाने उभारणे आणि प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियमांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे.