दाबोळीतून १९ तर मोपामधून ३ विमानांचे उड्डाण रद्द; डीजीसीएने थेट नियोजनातील त्रुटींवर ठेवले बोट

पणजी: 'इंडिगो' (IndiGo) एअरलाइन्सच्या संचालन संकटाचा फटका गोव्याला सलग दुसऱ्या दिवशीही बसला आहे. शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी गोव्यातील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इंडिगोच्या व्यवस्थापकीय त्रुटींचा प्रभाव फिस्कटलेल्या वेळापत्रकात ठळकपणे दिसून आला. दाबोळी विमानतळ प्रशासनाकडून सकाळी ११:१५ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित ३८ विमानांपैकी तब्बल ३१ उड्डाणे रद्द झाली आहेत, तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथूनही ३ उड्डाणे रद्द झाली आहेत.
विमानतळांवरील गंभीर स्थिती
दाबोळी विमानतळावर एकाच दिवसात १९ उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. केवळ ७ विमानांचे परिचालन सुरू आहे. रद्द झालेल्या विमानांमध्ये रायपूर, बंगळूरु (एकूण ५), इंदूर (२), अहमदाबाद (२), नवी दिल्ली (२), हैदराबाद (३), मुंबई, भोपाळ, जयपूर, सुरत आणि चेन्नई या महत्त्वाच्या मार्गांवरील विमानांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, मोपा विमानतळावरून नवी दिल्ली (6E542), बंगळूरु (6E6075), आणि हैदराबाद (6E6124) या ३ विमानांची उड्डाणे रद्द झाली. रद्द झालेल्या आणि पुन्हा बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठी इंडिगोच्या समन्वयाने सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नियमात सूट देण्याची इंडिगोची मागणी
नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाने (DGCA) या संकटाचे कारण सुधारित 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) नियमांच्या अंमलबजावणीतील घोर चूक आणि नियोजनातील त्रुटी असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडिगोने क्रू मेंबर्स आणि पायलट यांची संख्या कमी असताना देखील मोठ्या प्रमाणात फ्लाइट्सचे नियोजन केले होते. नोव्हेंबरपासून नवीन नियमावली लागू झाल्यापासून इंडिगोच्या ऑपरेशन्सवर याचा परिणाम झाला. कमी स्टाफ कडून जास्त काम करून घेणाच्या जुन्या सवयीमुळे सर्व व्यवस्थापन कोलमडले, यांची कबुली देखील इंडिगोच्या प्रशासनाने नागरी विमानोड्डाण महासंचालनालयाला दिल्याचे मागेच उघड झाले होते.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि सुरक्षा मानके कायम ठेवण्यासाठी, इंडिगोने A320 विमानांच्या संचालनासाठी १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत विशिष्ट FDTL तरतुदींमध्ये सूट/बदल करण्याची मागणी डीजीसीएकडे केली आहे.
सेवा पूर्ववत होण्यासाठी लागणार वेळ
कंपनीने आतापर्यंत दोनदा जाहीर माफी मागितली आहे आणि डीजीसीएला कळवले आहे की, सेवा स्थिर करण्यासाठी ८ डिसेंबरपर्यंत आणखी विमाने रद्द केली जातील आणि त्यानंतर पुढील काही आठवड्यांसाठी सेवांमध्ये लक्षणीय कपात केली जाईल. इंडिगोने फेब्रुवारी २०२६ पर्यंत सामान्य आणि स्थिर सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याचे आश्वासन नियामक संस्थेला दिले आहे.