
पणजी : गोव्यातील (Goa) किनारपट्टीत (Coastal belt) वाढ झाली आहे. एका नवीन सर्वेक्षणात राज्याच्या किनाऱ्याची लांबी १९३ किमी इतकी मोजण्यात आली. १९७० च्या दशकात १६० किमी एवढी होती. ३३ किमीने त्यात वाढ झाली आहे.
यासंदर्भात अधिकृत माहिती पुढे आली आहे. केंद्रीय भूविज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) दिलेल्या लेखी उत्तरात सुधारीत आकडेवारी दिली आहे. या बदलामुळे पायाभूत सुविधांचे नियोजन व आपत्ती नियंत्रणाच्या तयारीला मदत होईल; असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पुनर्विश्लेषण हे देशव्यापी अभ्यासाचा एक भाग आहे. ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाच्या किनारपट्टीचे पूनर्मुल्यांकन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय जलविज्ञान कार्यालयाने देशाचा सर्वात जुना वैज्ञानिक विभाग व राष्ट्रीय मॅपिंग एजन्सी, ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ यांच्या मदतीने पुनर्विश्लेषण केले. हे काम राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयातील संदर्भांद्वारे केल्याचे सिंग म्हणाले.
पुनर्विश्लेषण करताना, अधिकारी अधिक अचूक मोजमाप करण्यासाठी प्रगत जीआयएस (GIS )सॉफ्टवेअर आणि भरती-ओहोटीच्या रेषेच्या उच्च ‘रिझोल्यूशन डेटा’वर अवलंबून होते, असे मंत्र्यांच्या उत्तरात म्हटले आहे.
किनारी संरक्षण आणि विकास सल्लागार समितीने देशातील सर्व राज्यांसाठी सुधारित किनारपट्टी लांबीला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय पातळीवरही, नवीन विश्लेषणाअंतर्गत भारताची किनारपट्टी ७,५१६ किमी वरून ११,०९८ किमी पर्यंत वाढली असल्याची माहिती सिंग यांनी दिली.
गोव्यासाठी, लांब किनारपट्टीमुळे बंदरे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि पर्यटन क्षेत्रांसाठी नियोजन मजबूत होण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांना चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांविरुद्ध सुधारित आपत्ती जोखीम विश्लेषण आणि तयारीची अपेक्षा असल्याचे सिंग म्हणाले.