उड्डाणे लवकरच सामान्य होण्याची शक्यता

नवी दिल्ली: गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील हजारो हवाई प्रवाशांना मोठा त्रास देणारे 'इंडिगो' (IndiGo) एअरलाइन्सचे संचालन संकट आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. क्रूच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या सावळ्यागोंधळानंतर नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डीजीसीएने क्रू रोटेशन आणि साप्ताहिक सुट्टीसंदर्भात दिलेला एक महत्त्वाचा नियम तात्काळ प्रभावाने मागे घेतला आहे.
मागे घेतलेला नियम आणि त्याचे कारण
डीजीसीएने २० जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या एका पत्रात अशी सक्तीची तरतूद केली होती की, 'पायलट आणि क्रू सदस्यांना त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या (Weekly Rest) बदल्यात कोणतीही अन्य सुट्टी (Leave) वापरता येणार नाही'. इंडिगोने आपल्या अडचणींसाठी या कठोर नियमाला मुख्यत्वे जबाबदार धरले होते.

DGCA ने नियम का बदलला?
या नियमामुळे क्रूच्या उपलब्धतेत मोठी अडचण निर्माण झाली होती. डीजीसीएला अनेक एअरलाईन कंपन्यांकडून या नियमात बदल करण्यासाठी अर्ज प्राप्त झाले होते. सध्या सुरू असलेल्या विमानांच्या प्रचंड विस्कळीतपणामुळे (Operational Disruptions) आणि प्रवाशांच्या वाढत्या त्रासामुळे, देशातील हवाई उड्डाणांचे सातत्य आणि स्थिरता सुनिश्चित करणे अत्यावश्यक बनले होते. या पार्श्वभूमीवर, नियमामुळे निर्माण झालेल्या मनुष्यबळाच्या तुटवड्यावर तात्काळ मात करण्यासाठी हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. यामुळे एअरलाईन्सना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक अधिक लवचिकपणे (Flexible) आखता येणार आहे.

इंडिगोवर संकट का आले?
इंडिगोने आपल्या समस्यांसाठी प्रामुख्याने १ नोव्हेंबरपासून लागू झालेले नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिट' (FDTL) नियम आणि तांत्रिक बिघाड व हवामान यांना जबाबदार धरले होते. नवीन FDTL नियमांमुळे वैमानिकांच्या उड्डाण वेळेवर मर्यादा आल्या, तसेच त्यांना मोठा अनिवार्य आराम देणे बंधनकारक झाले. परिणामी, पायलट आणि केबिन क्रूची मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाल्याने 'रोस्टर क्रायसिस' निर्माण झाला.
काय होते FDTL चे कठोर नियम?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डीजीसीएने १ नोव्हेंबरपासून FDTL नियमांमध्ये सुधारणा केली होती. या नियमांनुसार, वैमानिकांच्या आठवड्याची विश्रांतीची वेळ वाढवून ४८ तास करण्यात आली. एका आठवड्यात रात्रीच्या वेळी (मध्यरात्री ते सकाळी ६ वाजेपर्यंत) केवळ दोनच 'नाईट लँडिंग' करण्याची परवानगी होती, जी पूर्वी सहा होती.
पायलट संघटनांकडे सहकार्याची अपील
देशभरात उड्डाणे प्रभावित होत असताना, डीजीसीएने सर्व पायलट संघटनांना एक विशेष अपील जारी केले आहे. वाढलेला हवाई प्रवासाचा ताण, धुक्याचा काळ आणि सुट्ट्यांमुळे वाढणारी गर्दी यामुळे होणारा विलंब टाळण्यासाठी पायलटांनी सहकार्य करावे, असे आवाहन डीजीसीएने केले आहे. नियामक संस्थेने हे स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना होणारी असुविधा टाळणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि स्थिर उड्डाण संचालन सुनिश्चित करण्यासाठी पायलटांचे समर्थन महत्त्वपूर्ण आहे.

या नियमातील तात्काळ बदलामुळे इंडिगोसह इतर एअरलाईन्सना त्यांचे वेळापत्रक पुन्हा व्यवस्थित आखणे शक्य होणार असून, सेवा लवकरच सामान्य होण्याची शक्यता आहे.