
काणकोण : तेलंगणातून (Telangana) कथित पोलीस बनून आलेले तिघे व आणखी एकाने खोला, काणकोण (Khola, Canacona) येथे एका स्थानिक व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न फसले.
यासंदर्भात पर्यटन व्यावसायिकाने हैदराबाद (Hydrabad) येथील श्रीनाथ राव व ३ कथित पोलिसांच्या विरुद्ध काणकोण पोलीस स्थानकात (Goa Police) तक्रार नोंदवली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, तेलंगणा नोंदणीकृत कार घेऊन चारजण जयेश पागी या व्यावसायिकाच्या माटवे, खोला येथील निवासस्थानी आले. यापूर्वी पागी यांच्याकडे कामाला असलेल्या व्यक्तीने दुकानाची चावी मागितली. सामान घ्यायचे असल्याचे सांगून रेस्टॉरंटमध्ये येण्यास सांगितले.
पागी कारमध्ये न जाता आपल्या स्कूटरवरून त्यांच्यामागे गेले. थोड्या अंतरावर पोचल्यावर अरुंद रस्त्यावर कार थांबवून दोघांनी पागी यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरडाओरड केल्यानंतर पागी यांचा भाऊ आला व त्यांनी आपली कार मध्ये घालून अपहरणकर्त्यांची कार रोखली. त्यानंतर स्थानिकही जमले. कारमधील व्यक्तींनी पागी यांच्याविरुद्ध हैदराबाद पोलीस स्थानकात तक्रार असल्याचे व चौकशीसाठी नेत असल्याचे सांगितले.
यावेळी त्याठिकाणी असलेले जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप, माजी सरपंच अजय पागी व इतरांनी त्यांच्या सांगण्यावर संशय आल्याने काणकोण पोलिसांना माहिती दिली. यासंदर्भात जयेश पागी यांनी श्रीनाथ राव व तिघा कथित तेलंगणा पोलिसांविरुद्ध रितसर तक्रार नोंद केली.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनाथ राव, पागी व आणखी एका स्थानिकाने एकत्र येऊन पर्यटन व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्यात बिनसले व राव व्यवसायातून बाहेर पडले. त्यातूनच त्यांनी तेलंगणा येथे तक्रार केली व पोलीस आल्याची माहिती या सूत्रांनी दिली.