सायंकाळी पुन्हा युती संदर्भात होईल चर्चा

पणजी: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (RGP) पक्षामध्ये होणारी संभाव्य युती अखेर संपुष्टात आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसकडून युतीच्या निर्णयाला वारंवार विलंब होत असल्याने, 'आरजीपी'ने आता दोन पावले मागे घेतली असून, १८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. युतीच्या भवितव्याबद्दलची पुढील सविस्तर माहिती आरजीपीचे नेते आज शुक्रवार सायंकाळपर्यंत पत्रकार परिषदेत देतील, अशी माहिती आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिली.
काँग्रेस उमेदवारांविरुद्ध लढत
आरजीपीने आज सकाळी १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करून काँग्रेसच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे केल्यामुळे, युतीचा प्रयोग जवळजवळ संपुष्टात आला आहे. आज आरजीपीच्या चिंबल, सांताक्रूझ आणि सेंट लॉरेन्स मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी बोरकर माध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसने वेळकाढूपणा केला
युतीचे नेमके काय झाले आणि उमेदवार उभे करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याबद्दलची सविस्तर माहिती आरजीपीचे अध्यक्ष आणि इतर नेते आज सायंकाळपर्यंत देतील, असे बोरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, युतीबाबत काय होणार, याची आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला १२ जागा वाटप झाल्या होत्या. मात्र, कोणतीही ठोस कृती किंवा 'हिरवा सिग्नल' मिळत नव्हता.
आचारसंहिता लागू होऊनही विलंब
आचारसंहिता लागू होऊन अनेक दिवस झाले, पण काँग्रेसकडून पुढील कृती होत नव्हती. बोरकर म्हणाले की, आमची पाऊले खूप मागे पडली आहेत आणि आम्हाला आणखी विलंब करणे शक्य नाही. भाजपने चाळीसही मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले आहेत आणि अपक्ष व मगोपला (MGP) पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता उर्वरित दिवसांमध्ये आम्हाला उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
या सर्व परिस्थितीत हा गोंधळ कोणामुळे झाला आणि याला कोण जबाबदार आहे, याचे सविस्तर स्पष्टीकरण आज सायंकाळपर्यंत आरजीपीच्या वतीने दिले जाईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.