
भुवनेश्वर (Bhubaneswar) : नव्यानेच लग्न झालेल्या जोडप्याच्या लग्नाचे ‘रिसेप्शन’ (wedding reception) हुबळीला (Hubballi) करण्याचे ठरले. कार्यक्रम स्थळ सजवण्यात आले. पाहुणे आले व कार्यक्रम सुरू झाला. अनेक प्रयत्न करून नवविवाहीत जोडपे ‘रिसेप्शन’ला पोचू शकले नाही. त्यांनी शेवटी ऑनलाईन (online) स्क्रीनवर ‘रिसेप्शन’ पाहिले. ऐन वेळी इंडिगो कंपनीचे भुवनेश्वर ते बेंगळुरू, हुबळी विमान रद्द झाल्याने, या जोडप्याला मोठी किंमत मोजावी लागली. आणि आपल्याच लग्नाच्या ‘रिसेप्शन’ला स्क्रीनवर ऑनलाईन उपस्थिती लावावी लागली.
हुबळी येथील मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वर येथील संगमा दास या तंत्रज्ञान क्षेत्रातील जोडप्याच्या बाबतीत ही घटना घडली. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
हुबळी येथील मेधा क्षीरसागर व भुवनेश्वर येथील संगमा दास हे जोडपे बेंगळुरूमध्ये राहते. २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर हुबळी येथील गुजराती भवनमध्ये पारंपारिक रिसेप्शन ठेवले होते. त्यासाठी त्यांनी इंडिगोचे विमान तिकिट घेतले. २ डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बेंगळुरू व नंतर हुबळीला जायचे होते. मात्र, बुधवारी विमानच रद्द झाले व त्यांच्या सर्व नियोजनावरच पाणी फेरले गेले. आपल्याच लग्नाच्या ‘रिसेप्शन’चे स्थळ गाठण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्टही कार्यक्रम स्थळी सजावट करून व सर्व तयारी करून वाट पाहत होते. शेवटी या जोडप्याला आपल्याच ‘रिसेप्शन’ला स्क्रीनवर ऑनलाइन उपस्थिती दाखवावी लागली.
इंडिगो विमान सेवेचा गोंधळ
दरम्यान, इंडिगोच्या विमान सेवेवर परिणाम झाल्याने गेल्या काही दिवसांत प्रवाशांना बरेच हाल सहन करावे लागले आहेत. इंडिगो कंपनीच्या विमान सेवेतील गोंधळामुळे ५५० देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. शुक्रवारी देशभरातील सुमारे ४०० विमान उड्डाणे रद्द केली. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि तांत्रिक समस्यांमुळे ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आली.