आकेत फास्ट फूड सेंटरला आग; २५ लाखांचे नुकसान

मडगाव अग्निशमन दलाकडून नियंत्रण; आग लागण्याचे कारण अस्पष्ट

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
2 hours ago
आकेत फास्ट फूड सेंटरला आग; २५ लाखांचे नुकसान

मडगाव: आके परिसरातील एका फास्ट फूड सेंटरला शनिवार ६ डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सुमारे २५ लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज असून, सुमारे ४ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.




माहितीनुसार, आके पॉवर हाऊसजवळ, यशोधन हॉस्पिटलनजीकच्या अल्झाना कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावर असलेल्या या फास्ट फूड सेंटरला आग लागली. सेंटरचे मालक रघुवेंद्र पै यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी त्यांच्या दुकानातून धूर येत असल्याची माहिती दिली. तत्काळ मडगाव अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.




या आगीत सेंटरमधील खाद्यपदार्थ बनवण्याचे सर्व साहित्य, वायरिंग, धान्यसाठा आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले असले तरी, २५ लाखांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा