कोलवाळ येथे स्वयंअपघात २२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
कोलवाळ येथे स्वयंअपघात २२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

म्हापसा: मुशीरवाडा, कोलवाळ येथे वीज खांबाला दुचाकीची धडक बसून झालेल्या स्वयंअपघातात जखमी राकेश सुकांत सामल (२२, रा. करक्याचो व्हाळ, रेवोडा) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हा अपघात शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला होता. राकेश हा हणजूणहून रेवोडा येथील आपल्या घरी जीए ०३ बीडी ७०८४ या क्रमांकाच्या फॅसिनो स्कूटरवरून जात होता. मुशीरवाडा कोलवाळ येथील कनिष्ठ वीज अभियंता कार्यालयाजवळ त्याची भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकली. या धडकेत दुचाकीस्वार राकेश हा वीज खांब आणि दुचाकीच्या मध्ये चिरडला गेला.

घटनेच्या वेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या नजरेस हा अपघात पडला. त्याने काही अंतरावर राम मंदिराच्याजवळ नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर कोलवाळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमी राकेश सामल याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले, तेथून त्याला त्वरित गोमेकॉ येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना शनिवार, ६ डिसेंबर रोजी पहाटे त्याचे निधन झाले.

अपघाताचा पंचनामा कोलवाळ पोलीस उपनिरीक्षक विष्णू जाधव आणि हवालदार महादेव परब यांनी केला. पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा