फातोर्डा येथे सापडला संशयित आरोपी

पणजी : जंगलात शेळ्या चरवण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी संशयित मिलाराम तिर्की (५२) याला फातोर्डा परिसरातून अटक केली. संशयित मडगाव बसस्थानकानजीकच्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
छत्तीसगडमधील जशपूर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंद केली आहे. तक्रारीनुसार, मुलगी शेळ्या चरवण्यासाठी जंगल परिसरात गेली असताना गावात राहणार्या मिलाराम तिर्की याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. सार्वजनिक ठिकाणी बदनामी होईल अशा भीतीने पीडितेने या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली नाही. मात्र, पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने तिने सर्व प्रकार मावशीला सांगितला. यानंतर वडिलांच्या तक्रारीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करुन ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जशपूर पोलीस ठाण्यात मिलाराम तिर्की याच्याविरोधात बलात्कार तसेच पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हा नोंद केल्यानंतर जशपूर पोलीस मिलारामच्या शोधात होते. जशपूर पोलिसांनी ऑपरेशन ‘अंकुश’ या नावाने विशेष शोधमोहीम राबवली. त्याने वास्तव्य केलेल्या ठिकाणीही पोलिसांनी छापे टाकले होते. त्यानंतर जशपूर पोलिसांना मिलाराम हा गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यावर एक पथक गोव्यात आले. संशयित फातोर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मडगाव बसस्थानकाच्यानजीकच्या एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून कामाला होता. जशपूर पोलिसांनी त्याला रेस्टॉरंटमधूनच ताब्यात घेतले व जशपूर येथे नेत अटक केली. मिलाराम हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
देशात विविध भागात गुन्हे करून गुन्हेगार गोव्यात येऊन वास्तव्य करत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाकडूनही भाडेकरू पडताळणीची मोहीम आणखी तीव्र करत कायद्याचे पालन न करणार्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याची गरज भासू लागली आहे.