जिल्हा पंचायत निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक करणार : मुख्यमंत्री

पाळीतील भाजपचे उमेदवार सुंदर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 11:48 pm
जिल्हा पंचायत निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक करणार : मुख्यमंत्री

पाळी जि.पं. उमेदवार सुंदर नाईक यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी उपस्थित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत पाळीतील कार्यकर्ते.

डिचोली : साखळी मतदारसंघातील (sakhali constituency) जनता प्रत्येक निवडणुकीत भाजपसोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. या मतदारसंघातील जनतेने नेहमीच भाजपला मोठे प्रेम दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी डिचोली येथे केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, या जिल्हा पंचायत निवडणुकीत यावेळी पाळी मतदारसंघात ‘रेकॉर्ड ब्रेक’ असे मतदान होऊन भाजपचे उमेदवार सुंदर नाईक हे मोठ्या मतांच्या आघाडीने निवडून येतील.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी पाळी मतदारसंघाचे उमेदवार सुंदर नाईक यांनी शनिवारी (दि. ६) डिचोली येथील बीडीओ कार्यालयात निवडणूक अधिकारी श्रीकांत पेडणेकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सुलक्षणा सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, आमोणेचे सरपंच सागर फडते, सुर्लच्या सरपंचा साहिमा गावडे, वेळगेच्या सरपंचा सपना पार्सेकर, पाळीचे सरपंच संतोष नाईक, साखळीच्या नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी गेल्या पाच वर्षांत मोठी कामे केली. त्यांनी सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सरकारची 'माझे घर' ही योजना जिल्हा पंचायत सदस्यांमार्फतच संपूर्ण गोव्यात लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री त्यांनी दिली आणि गोव्यातील सर्व मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
उमेदवार सुंदर नाईक यांनी बोलताना सांगितले की, माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांच्यासोबत त्यांना एकेकाळी पक्षाचे काम करण्याची संधी मिळाली होती. आज त्यांचेच पुत्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे, जी पाळीतील सर्व लोकांना मिळालेली उमेदवारी आहे.
विक्रम मोडण्याचा विश्वास
साखळी भाजप मंडळ अध्यक्ष रामा नाईक यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की, पाळी मतदारसंघात भाजप गेल्या वेळेचा आपलाच विक्रम मोडून मतांची मोठी आघाडी मिळवणार आणि नवीन विक्रम प्रस्थापित करणार.
ट्रिपल इंजिन सरकारसाठी आवाहन
डॉ. सावंत यांनी कार्यकर्त्यांमधील उत्साहाचे कौतुक केले आणि सांगितले की, गोव्यात भाजप सरकारकडून होत असलेली विकासकामे आणि प्रगती तसेच त्याला केंद्र सरकारचे मिळत असलेले सहकार्य यापुढेही अबाधित ठेवण्यासाठी सर्व मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार निवडून येत 'ट्रिपल इंजिन सरकार' चा काम पाहण्याची संधी सर्वांनाच मिळणार आहे.