एड्स नियंत्रण संस्थेचा अहवाल : राज्यातील २५ ते ३४ वर्षे वयोगटातील पुरुष बाधितांची संख्या जास्त

पणजी : राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान २३७ जणांना एचआयव्हीची लागण (HIV infection) झाली. यातील ९ गरोदर महिला (Pregnant women) वगळता २२८ पैकी १७३ पुरुष, ५४ महिला तर एक तृतीयपंथी (Transgender) आहे. महिलांच्या वयोगटानुसार पाहता ३५ ते ४९ वयोगटातील बाधितांची संख्या अन्य कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक आहे. यानंतर २५ ते ३४ वयोगटातील बाधित महिलांची संख्या अधिक आहे. राज्य एड्स नियंत्रण संस्थेने जार केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, वरील दहा महिन्यांत एकूण ५४ बाधितांपैकी २५ (४६.३ टक्के) महिला या ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. २५ ते ३४ वयोगटातील १६ (२९.६ टक्के), ५० हून अधिक वर्षांच्या ११ (२०.४ टक्के) तर १५ ते २४ आणि १४ वर्षांखालील प्रत्येकी एक महिला बाधित आहे. पुरुषांमध्ये १७३ पैकी सर्वाधिक ६७ बाधित (३८.७ टक्के) हे २५ ते ३४ वयोगटातील आहेत. त्यानंतर ३५ ते ४९ वर्षाचे ५४ (३१.२ टक्के), ५० हून अधिक वर्षांच्या ३१ (१७.९ टक्के), तर १५ ते २४ गटातील २७ (११ टक्के) बाधित आहेत.
पुरुषांमध्ये १४ वर्षांखालील एक बाधित व्यक्ती आढळली आहे. मागील काही वर्षात ३५ ते ४९ वयोगटातील महिला बाधितांची संख्या कमी झाली होती. २०२० मध्ये एकूण बाधित महिलांपैकी ५६ टक्के या वयोगटातील होत्या. २०२१ मध्ये ५२ टक्के, २०२२ मध्ये ३७ टक्के, २०२३ मध्ये ३८ टक्के तर २०२४ मध्ये ३३ टक्के बाधित महिला या वयोगटातील होत्या. वरील कालावधीत दोन महिलांना एड्सची लागण झाली होती. सप्टेंबर अखेरीस राज्यात एड्समुळे वीस रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच महिला रुग्ण होत्या.
महिला बाधितांची संख्या घटली
राज्यात २००९ ते २०२४ या काळात पुरुषांच्या तुलनेत महिलांना एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण सुमारे ६.९४ टक्क्यांनी घटले आहे. तर पुरुषांना लागण होण्याचे प्रमाण ६.९६ टक्क्यांनी वाढले आहे. २००९ मध्ये एचआयव्हीच्या एकूण बाधितांपैकी ५९.३ टक्के पुरुष तर ४०.७ टक्के महिला होत्या. २०२४ मध्ये पुरुष बाधित ६६.२६ टक्के व महिला बाधित ३३.७३ टक्के होते.
महिन्याला सरासरी ४१ रुग्ण
राज्यात एचआयव्हीचा पहिला रुग्ण १९८७ मध्ये आढळला होता. तेव्हापासून ऑक्टोबर २०२५ अखेरीस आरोग्य खात्यातर्फे १४ लाखांहून अधिक जणांची रक्त तपासणी केली होती. यामध्ये १८ हजार ८०२ जणांना एचआयव्ही अथवा एड्सची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ राज्यात वरील कालावधीत वर्षाला सरासरी ४८२ तर महिन्याला सरासरी ४१ रुग्ण आढळले.