साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू, तर उगवे परिसरात ‘ओंकार’चा वावर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th December, 08:48 pm
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : दोन महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहिल्यानंतर ‘ओंकार’ हत्ती पुन्हा गोव्याच्या सीमेत दाखल झाला आहे. उगवे भागात त्याने शेतीचे नुकसान तसेच गाड्यांची मोडतोड केली. जिल्हा पंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार


‘ओंकार’ पुन्हा गोव्यात दाखल

दोन महिने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन ६३ दिवसांनंतर ‘ओंकार’ हत्ती पुन्हा गोव्याच्या सीमेत दाखल झाला आहे. रविवारी दुपारी पत्रादेवी फकीर फाटा येथे तो लोकांच्या दृष्टीस पडला. ‘ओंकार’च्या पुनरागमनाने शेतकरी, बागायतदार धास्तावले आहेत. वन खात्याचे रक्षक कर्मचारी ओंकार हत्तीवर नजर ठेवून आहेत.

झुआरीनगर येथील भंगारअड्ड्यांन पुन्हा आग

झुआरीनगर सांकवाळ येथील भंगारअड्डे १५ दिवसांत दुसऱ्यांदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आजूबाजूला असलेल्या सुमारे २०-२२ भंगारअड्ड्यांना आगीपासून सुरक्षित ठेवण्यात यश मिळाले.

सोमवार 

ईडीकडून १२६८ कोटींची मालमत्ता जप्त

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागाने शिवशंकर मयेकर मनी लाँडरिंग प्रकरणात १२६८.६८ कोटी रुपये किमतीची ५ लाख चौरस मीटर जमीन जप्त केली. बार्देश तालुक्यातील हणजूण, आसगाव व उसकई मधील १९ स्थावर मालमत्तांचा यात समावेश आहे. यापूर्वी ईडीने १२.८५ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि बँक खाती गोठवली होती.

रुमडावाडा येथे कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वास्को ते सडा मार्गावरील रुमडावाडा येथे झालेल्या भीषण अपघातात हेडलँड सडा येथील एमपीटी कॉलनीत राहणारे ५५ वर्षीय मल्लीनाथ गौडार यांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला दुचाकीसह उभे असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली.


नेसाय येथील कंपनीला आग

नेसाय येथील औद्योगिक वसाहतीतील केमटेक या स्वच्छतेचे प्रॉडक्टस बनवणाऱ्या कंपनीच्या युनिटला आग लागण्याची घटना घडली. यामध्ये लाखोंची हानी झाली. मडगाव अग्निशामक दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले व सुमारे १० लाखांची मालमत्ता वाचवण्यात यश आले.

मंगळवार 

काँग्रेसची पहिली यादी जाहीर

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर गोव्यातील ७ आणि दक्षिण गोव्यातील ४, अशा एकूण ११ मतदारसंघांतील उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली. यानंतर आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी काँग्रेस पक्षाने विश्वासघात केल्याचा आरोप केला.

महिलेची बदनामी करून खंडणी उकळणाऱ्यास अटक

सोशल मीडियावर महिलेचा फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करणे तसेच तिच्याकडून ३५ हजार रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने पीडित महिलेच्या माजी प्रियकरला कर्नाटकातून अटक केली.

बुधवार 

‘ह्युज प्रेसिझन’च्या एमडी, मॅनेजरला अटक

दारूगोळा बेकायदेशीरपणे आयात केल्याच्या प्रकरणात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाने वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये यांना अटक केली.

वासंती सालेलकर मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी

कोळशेकातर कारापूर येथे विजेचा झटका लागून संशयास्पदरित्या मृत पावलेल्या वासंती सालेलकर यांच्या मृतदेहाची शवचिकित्सा एका डॉक्टरकडून न होता डॉक्टरांच्या पॅनलमार्फत व्हावी, अशी मागणी वासंती हिचे नातेवाईक व समाजसेवकांकडून करण्यात आली.


कळंगुटमध्ये झाड कोसळून पर्यटक जखमी

परबावाडो कळंगुट येथे एका आंब्याच्या झाडाची एक भलीमोठी फांदी पर्यटकांच्या जीप व दुचाकीवर कोसळली. या घटनेत शाह कुटुंबातील सर्वजण किरकोळ जखमी होऊन चमत्कारिकरित्या बचावले. फक्त चौघांना किरकोळ दुखापत झाली. एक दुचाकीस्वारही फांदीखाली अडकला गेला.

कारच्या धडकेत जखमी पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पणजी येथील मार्केटजवळ मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. अल्पवयीन असलेल्या नेपाळी मुलाने दारुच्या नशेत कार चालवताना हा अपघात घडवल्याचा आरोप असून, पणजी पोलिसांनी अल्पवयीन चालकाला अटक केली आहे.

गुरुवार 

वासंती सालेलकर यांचा मृत्यू विजेचा शॉक लागूनच, वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

कोळशेकातर-कारापूर येथे विजेचा झटका लागून संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या वासंती सालेलकर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी डॉक्टरांच्या पॅनलमार्फत व्हावी, अशी मागणी तिचे नातेवाईक तसेच समाजसेवकांनी केली होती. या मागणीनुसार गुरुवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तिच्या मृतदेहाची शवचिकित्सा केली. प्राप्त अहवालानुसार वासंती यांचा मृत्यू विजेचा शॉक लागूनच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दाबोळी विमानतळावरील इंडिगोची ११ विमाने रद्द

अनेक अडथळ्यांमुळे इंडिगो कंपनीच्या विमान सेवेवर परिणाम झाला आहे. गुरुवारी दाबोळी विमानतळावरील ११ उड्डाणे रद्द करण्यात आली असून काही विमाने उशीरा येत आहेत.

शुक्रवार

१६ लाखांची फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल

जादा व्याजाचे आमिष दाखवून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्यूटरचे इंद्रजीत कदम, अमेय कदम, स्मिता कदम यांच्यासह राहुल गाडवे, रूपाली गाडवे आणि शैलेश वाघ यांच्याविरोधात मेरशी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी होणार आहे.

उगवे परिसरात ‘ओंकार’कडून चारचाकी वाहनाची मोडतोड

ओंकार हत्तीने सध्या उगवे कासुले परिसरात मुक्काम ठोकला आहे. त्याच्याकडून कवाथे, केळी यांची नासधूस सुरूच असून रात्री लोकवस्तीत येऊन वाहनांची तोडफोड केली जात आहे. उगवे परिसरात एका चारचाकी वाहनाची त्याने मोडतोड केली.

शनिवार


अपघातात राज्यातील चौघे युवक ठार

राज्यभरात शनिवार हा घातवार ठरला. काणकोण चापोली धरण परिसरात झालेल्या अपघातात युवक ठार झाला. तर दोघे जण जखमी झाले. कोलवाळ येथे स्वयंअपघातात जखमी युवक ठार झाला. तर लोणावळा येथील अपघातात गोव्यातील दोघे पर्यटक युवक ठार झाले. सांकवाळ येथे युवकाने आत्महत्या केली.

जेनिटो कार्दोजला सशर्त जामीन

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आणि सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोज याला मेरशी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

लक्षवेधी

आके परिसरातील एका फास्ट फूड सेंटरला आग लागली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सुमारे २५ लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे.

रेवोडा बार्देश येथील बीएनएफ रेसिडेन्सी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागली. या दुर्घटनेत दोन युवती जखमी झाल्या असून त्यांच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून फ्लॅटचे सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. आग वातानुकूलित संचामध्ये शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.

संशयिताने लाच मागितल्याचा भक्कम पुरावा मिळाला नाही. तसेच मूळ इलेक्ट्रॉनिक्स पुरावे (टेप-रिकॉर्डिंग्स) यातही अनेक तांत्रिक त्रुटी आणि कालबाह्यता दिसून आल्या, असे निरीक्षण नोंदवून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयकर अधिकारी सी. व्ही. नारायण रेड्डी यांना लाच प्रकरणात विशेष न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा रद्द केली. पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

राज्यातील मतदारांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) अंतर्गत आतापर्यंत १०.५५ लाख (९६.५ टक्के) मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म संकलित झाले आहेत. सुमारे ९० हजार मतदारांचे फॉर्म परत आलेले नाहीत. अशा मतदारांची नावे मसुदा यादीत येणार नाहीत. सुमारे २.२० लाख मतदारांचे अथवा त्यांच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या मतदार यादीत नाही. अशा मॅपिंग न झालेल्या मतदारांबाबत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिली.

शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर २००९ मध्ये सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणात सत्र न्यायालयाने संशयित सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या दोघांना सुनावण्यात आलेली चार वर्षांची सश्रम सक्तमजुरी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. तर, ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्थगित ठेवली आहे.