थकबाकी वसुलीसाठी मुरगाव नगरपालिकेची ‘गांधीगिरी’

‘गुलाब घ्या आणि थकबाकी भरा’ मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 11:30 pm
थकबाकी वसुलीसाठी मुरगाव नगरपालिकेची ‘गांधीगिरी’

एका फास्ट फूड दुकानाला टाळे ठोकताना मुरगाव पालिकेचे कामगार. सोबत रिकव्हरी ऑफिसर मंगलदास खांडेपारकर व इतर.

वास्को : मुरगाव पालिकेने(Murgaon Municipality) भाडेपट्टी (Lease), परवाना शुल्क (License fee)आणि इतर करांची मोठी थकबाकी वसूल (Recovery of outstanding dues) करण्यासाठी एक अभिनव ‘गांधीगिरी’ मोहीम सुरू केली आहे. ‘गुलाबाचे फूल घ्या आणि आमची थकबाकी फेडा,’ असे आवाहन करत पालिकेने मोठ्या थकबाकीदारांना गुलाबांची फुले देण्यास सुरुवात केली आहे. गुलाबाचे फूल घेतल्यानंतरही थकबाकी फेडण्यास उत्सुकता न दाखवणाऱ्या थकबाकीदारांना ‘काटेही दाखविण्याची’ म्हणजेच कठोर कारवाई करण्याची तयारी पालिकेने केली आहे.
मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी या मोहिमेचा अनुभव सांगितला. मी मडगाव पालिकेचा मुख्याधिकारी असताना अशी मोहीम राबवली होती. तेव्हा ५० रु.च्या गुलाबांच्या बदल्यात ५० लाखांची थकबाकी वसूल झाली होती. गेले काही वर्षे थकबाकीदार पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटिसांना गांभीर्याने घेत नव्हते. त्यामुळे पालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम झाला असून, कर्मचारी आणि कामगारांचे वेतन देण्याचा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. यामुळे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्यासह नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी आता थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे.
नगराध्यक्ष बोरकर म्हणाले, ‘देश बदल रहा है’, त्याच उक्तीनुसार ‘मुरगाव पालिका बदल रही है.’ थकबाकीदारांना 'गुलाब' देऊन थकबाकी फेडण्याची विनंती करत आहोत. त्यांनी ही विनंती मान्य करून थकबाकी फेडली तर ठीक आहे, अन्यथा त्यांनी 'गुलाबाचे काटे' दाखवण्याची पाळी आमच्यावर आणू नये, हा संदेश आम्ही त्यांना देत आहोत. थकबाकीदारांनी पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून त्वरित थकबाकी भरण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोहिमेला प्रतिसाद
गेल्या दोन दिवसांमध्ये काही बँकांना गुलाबांसह थकबाकीची माहिती देण्यात आली आहे. काही बँका आणि संबंधित दुकानमालक भाडेपट्टी भरत नसल्याने ही थकबाकी वाढत चालली होती. संबंधित थकबाकीदारांना गुलाब देण्यात आल्यानंतर आता त्यांच्यामध्ये धावपळ सुरू झाली आहे. आगामी दिवसांमध्ये इतर मोठ्या आस्थापनांनाही गुलाब देण्यात येणार असल्याचे एका सूत्रांनी सांगितले.