बंगळुरू विमानतळावर ताब्यात : ११ कोटींच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी होता फरार

पणजी : मागील सात महिने ११ कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी (n drug trafficking cases) फरार असलेल्या विनेश वाय. के. या केरळ नागरिकाला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (ANC) अटक केली आहे. थायलंडमधून बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर विनेशला ताब्यात घेण्यात आला होता. दरम्यान, म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्तहेरांचा माहितीवरून २१ एप्रिल २०२५ रोजी शिवोली परिसरातील एका घरावर छापा टाकला होता. त्यावेळी पथकाने केरळ येथील मोहम्मद समीर याला ताब्यात घेत त्याच्याकडून ११.०७ कोटी रुपये किमतीचे ११० ग्रॅम उच्च दर्जाचे एलएसडी लिक्विड आणि गांजा जप्त केला होता. त्यानंतर एएनसीने अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयित समीर याला अटक केली होती. समीरच्या चौकशीतून केरळमध्ये राहणाऱ्या विनेश वाय. के. याचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले होते. तेव्हापासून एएनसी विनेशचा शोध घेत होती.
फरार आरोपीला लुकआऊट नोटीस
संशयित विनेश फरार झाल्यामुळे एएनसीने त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. ७ डिसेंबर रोजी विनेश थायलंडमधून बंगळुरू विमानतळावर उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आणि गोवा एएनसीच्या स्वाधीन करण्यात आले. एएनसीने संशयित विनेशला अटक करून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची एएनसी कोठडी ठोठावली आहे.