अग्नितांडवामुळे २७ वर्षांनी हडफडे गाव पुन्हा चर्चेत

प्रतापसिंग राणे सरकार पाडणाऱ्या फुटीर आमदारांचा तळ होता हडफडेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
अग्नितांडवामुळे २७ वर्षांनी हडफडे गाव पुन्हा चर्चेत

उमेश झर्मेकर
म्हापसा : हडफडे गाव (Hadfade village) आणि येथील ‘मायझोन्स रिसॉर्ट’ (Myzon's Resort) हे गोव्याच्या राजकारणात १९९८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे (Chief Minister Pratap Singh Rane) सरकार कोसळल्यामुळे चर्चेत आले होते. आता २७ वर्षांनी पुन्हा याच रिसॉर्टच्या परिसरातील अग्नितांडव दुर्घटनेमुळे हा परिसर प्रकाशात आला आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत 'बर्च बाय रोमिओ लेन' या नाईट क्लबला आग लागून २५ निष्पाप लोकांचा बळी गेला.
१९९४ मध्ये उभारलेल्या या रिसॉर्टचे आता ‘मायझोन्स लेक व्ह्यूव रिसॉर्ट’ असे नामकरण झाले आहे. दरम्यान, गेल्या २० डिसेंबर २०२३ रोजी मूळ जमीन मालकांनी हडफडे-नागवा पंचायतीकडे तक्रार केली होती की, सर्वे क्र. १५८/० व १५९/० या जागेत सुरेंद्रकुमार खोसला यांनी बेकायदेशीर दुकाने, रेस्टॉरंट, सहा बांधकामे व दोन डिस्को स्टेज बांधले आहेत.
पंचायतीने पाहणी करून १७ जानेवारी २०२४ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यानंतर २० मे २०२४ रोजी अतिक्रमण हटाव नोटीस जारी केली. मात्र, खोसला यांनी पंचायत संचालनालयाकडून या नोटिसीला स्थगिती मिळवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, खोसला यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये गौरव लुथरा, अजय गुप्ता व सौरभ लुथरा यांच्याकडे मासिक भाडे ३ लाख रुपये अधिक जीएसटी या दरात क्लब व बार रेस्टॉरंट चालवण्यासाठी परवाना पत्राचा करार केला होता. दरम्यान, या दुर्घटनेसाठी क्लब व्यवस्थापनाला कारणीभूत ठरवून त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
२७ वर्षांपूर्वीचा राजकीय भूकंप
१९९८ मध्ये काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. त्यावेळी राणे सरकार पाडणारे उपमुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा समर्थक १० काँग्रेसच्या फुटीर आमदारांचा गट मायझोन्स रिसॉर्टमध्ये एका आठवड्यासाठी तळ ठोकून होता. यामुळे हे रिसॉर्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते.
२१ वर्षांपासून मालमत्ता वादात
दुर्घटनाग्रस्त बर्च बाय रोमिओ लेन क्लब आणि मायझोन्स लेक व्ह्यूव रिसॉर्टचा परिसर ३७ हजार चौमी जागेत व्यापलेला आहे. २००४ साली जमीन मालक प्रदीप घाडी आमोणकर व सुनील दिवकर यांनी सुरेंद्रकुमार खोसला यांच्यासोबत जमीन विक्रीचा करार केला होता. मात्र, सहा महिन्यांतच हा करार रद्द करण्यात आल्यामुळे गेल्या २१ वर्षांपासून या मालमत्तेचा मालकी हक्क न्यायप्रविष्ट बनलेला आहे.

हेही वाचा