बनावट विक्री कराराचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे निरीक्षण

पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर याने बनावट पद्धतीने विक्री करार तयार केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयाने हरमलकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याबाबतचा आदेश सत्र न्यायाधीश ईर्शाद आगा यांनी दिला.
हणजूण येथील सर्व्हे क्र. ४२६/५ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी २०२२ मध्ये रोहन हरमलकर याच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जमीन हडप प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन झाल्यानंतर हणजूण येथे सर्व्हे क्र. ४४४/८ मधील २,४५० चौ.मी. जमीन हडप प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दखल घेऊन तपास सुरू केला असता, त्यात मनी लाॅन्ड्रिंगच्या संशय असल्याने कारवाई सुरू केली. ईडीने २४ आणि २५ एप्रिल रोजी रोहन याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणच्या घरांवर तसेच कार्यालयावर छापा टाकला. त्याच्याकडून १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनीची, तसेच ६०० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. ईडीने हरमलकरला ३ जून २०२५ रोजी अटक केली. या प्रकरणी हरमलकर याने न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. याच दरम्यान ईडीने हरमलकर याने अल्कांत्रो डिसोझा व इतरांसह षड्यंत्र रचून मिळवलेली २१२.८५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. त्यात हणजूण, रेवोडा, नादोडा, कामुर्ली, पर्रा आणि बार्देश तालुक्यातील इतर मालमत्तांचा समावेश आहे.
त्यानंतर ईडीने रोहन हरमलकर आणि मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याच्यासह अल्कांत्रो डिसोझा, स्टिव्हन डिसोझा आणि समीर सातार्डेकर यांच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान हरमलकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
न्यायालयात सुनावणी झाली असता, ईडीतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता सिद्धार्थ सामंत यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी हरमलकर याने विक्री करार बनावट पद्धतीने केल्याचे न्यायालयात पुराव्यासह सादर केले तसेच इतर मुद्यासंदर्भात युक्तिवाद मांडला. न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून जामीन अर्ज फेटाळून लावला.
ईडीने ३ जूनला रोहनला केली होती अटक
ईडीने हरमलकरला ३ जून २०२५ रोजी अटक केली. यावेळी हरमलकर आणि मोहम्मद सुहैल उर्फ मायकल, अल्कांत्रो डिसोझा, स्टिव्हन डिसोझा आणि समीर सातार्डेकर यांच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.