
पणजी : ओतियात - ताळगाव येथे दुचाकी चालकाचा शनिवार, दि. ६ रोजी रात्री स्वयंअपघात झाला. यात दुचाकी चालक बासू काद्री (२६, कामराभाट - ताळगाव) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ६ रोजी रात्री ओतियात - ताळगाव येथे दुचाकी चालकाचा स्वयंअपघात झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर सदर अपघाताची माहिती पणजी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, १०८ रुग्णवाहिकेने सदर व्यक्तीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सदर व्यक्तीची ओळख पटली नसल्यामुळे पणजी पोलिसांना तशी माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच उपनिरीक्षक महेश नाईक यांनी इस्पितळात जाऊन चौकशी केली. याच दरम्यान कामराभाट येथील राजू काद्री यांनी आपल्या मुलाचा अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला मृतदेहाची ओळख पटविण्यास सांगितले. त्याने आपला मुलगा बासू काद्री (२६) असल्याचे सांगितले. शवचिकित्सा करून अंतिम संस्कारसाठी मृतदेह सायंकाळी बासूच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक महेश नाईक यांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.