दिल्लीतील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

'बॅचलर पार्टी'साठी आलेल्या नवरदेवाचाही बळी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
दिल्लीतील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

म्हापसा : हडफडे येथील नाईट क्लबमधील (Night club in Hadfade) भीषण अग्नितांडवात दिल्लीतील एकाच कुटुंबातील चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेतून भावना जोशी कुमार नावाची महिला कशीबशी बचावली आहे. दुसरीकडे, बंगळुरूहून 'बॅचलर पार्टी'साठी आलेल्या नवरदेव इशाक याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
दिल्लीहून आलेल्या या कुटुंबातील चार जणांना जीव गमवावा लागला. भावना जोशी यांचा पती विनोद कुमार, आणि त्यांच्या तीन बहिणी - सरोज जोशी, अनिता जोशी आणि कमला जोशी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. भावना जोशी यांनी कसाबसा आपला जीव वाचवला, मात्र त्यांनी या घटनेत आपला पती आणि तिन्ही बहिणी गमावल्या.दुसरीकडे, बंगळुरूहून बॅचलर पार्टीसाठी आलेल्या चार-पाच पर्यटकांच्या गटातील इशाक याचे लवकरच लग्न ठरले होते. मित्रांना गोव्यात पार्टी देण्यासाठी आलेल्या इशाकचा दुर्घटनेत मृत्यू झाला, तर त्याचे इतर मित्र बचावले आहेत.
दरम्यान, क्लबमध्ये मृत पावलेल्या काही कामगारांचा शोध घेत त्यांचे नातेवाईक सकाळी दुर्घटनास्थळी पोहोचले होते. त्यांचे फोन लागत नसल्याने व काहीच थांगपत्ता लागत नसल्याने ते चौकशी करत होते. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हणजूण पोलीस स्थानकात पाठवले आहे.
टॅक्सी उशिरा आल्याने जीव वाचला
दिल्लीतील आणखी एका पर्यटक कुटुंबावर टॅक्सी उशिरा आल्यामुळे काळाचा घाला टळला. हे कुटुंब रात्री १०.३० वाजता क्लबमध्ये पोहोचणार होते. मात्र, त्यांनी बोलवलेली टॅक्सी गाडी उशिरा पोहोचल्याने, हे कुटुंब सुदैवाने या भीषण दुर्घटनेत सापडले नाही.

हेही वाचा