हडफडेतील ‘त्या’ बांधकामाला होती डिमोलिशन नोटीस

मीठागरच्या संवेदनशील जागेत बेकायदेशीर बांधकाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
हडफडेतील ‘त्या’ बांधकामाला होती डिमोलिशन नोटीस

म्हापसा : साकवाडी-हडफडे (Sakwadi-Hadfade) येथील मीठागरच्या (आगर) संवेदनशील जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी, हडफडे-नागवा पंचायतीने सुरेंद्र कुमार खोसला (Surendra Kumar Khosla) यांना २० मे २०२४ रोजी 'अतिक्रमण हटाव नोटीस' बजावली होती. याच बांधकामामध्ये नंतर दुर्घटनाग्रस्त 'बर्च बाय रोमिओ लेन' (Birch by Romeo Lane) हा नाईट क्लब थाटला गेला होता.
प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी २० डिसेंबर २०२३ रोजी पंचायतीकडे तक्रार केली होती. सर्वे क्र. १५८/० व १५९/० या जमिनीत खोसला यांनी बेकायदेशीररीत्या दुकाने, रेस्टॉरन्ट, सहा बांधकामे आणि दोन डिस्को स्टेजचे (प्लॅटफॉर्म) बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
या तक्रारीची प्रत त्यांनी मुख्यमंत्री, पर्यावरण आणि पर्यटन मंत्री, स्थानिक आमदार, राज्याचे मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पंचायत संचालक, मुख्य नगरनियोजक, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, प्रदूषण मंडळ व किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण यांना सादर केल्या होत्या.
दरम्यान, तक्रारीच्या आधारे पाहणी केल्यानंतर तत्कालीन पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी खोसला यांना १५ दिवसांत बांधकाम स्वतःहून हटवण्याचे निर्देश दिले होते. मुदतीत बांधकाम न पाडल्यास पंचायत स्वतःहून ते पाडेल आणि खर्च वसूल करेल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला होता.
बांधकामावर गंभीर आक्षेप
तक्रारदारांनी या बांधकामावर गंभीर आक्षेप घेतले होते. मीठाघरच्या जागेत मातीचा भराव टाकून केलेले डिस्को स्टेजचे बांधकाम अस्थिर असून ते कोणत्याही क्षणी पडून निष्पाप पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते. या जागेतील सांडपाणी खाडीच्या माध्यमातून थेट समुद्रात सोडले जात होते. ‍जागा अविकसित असल्यामुळे या अतिक्रमित बांधकामासाठी कोणताही परवाना घेण्यात आलेला नव्हता.
प्रशासकीय दिलासा : १७ जानेवारी २०२४ रोजी पंचायतीने सदर जागेची पाहणी केली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पंचायतीने सुरेंद्र कुमार खोसला यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसविरोधात खोसला यांनी पंचायत संचालनालयाकडे अपील केले होते, जिथे संचालनालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा