राज्यात भ्रष्टाचाराशी संबंधित १३ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

‘एसीबी’कडून १२ प्रकरणांत न्यायालयात आरोपपत्र दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 mins ago
राज्यात भ्रष्टाचाराशी संबंधित १३ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित

पणजी : जगभरात (Around the world) ९ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस (International Anti-Corruption Day) म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची माहिती घेतली असता, मागील पाच वर्षांत भ्रष्टाचार विरोधी पथकाने (ACB) १३ गुन्हे दाखल केले आहेत, तर १२ प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून १३ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय मागील पाच वर्षांत ९१४ तक्रारी निकालात काढल्याची माहिती समोर आली आहे.
जगातील सरकारी, खासगी आस्थापना, तसेच इतर आस्थापनांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्राने ३१ ऑक्टोबर २००३ रोजी निर्णय घेऊन जगभरात ९ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून करण्यात आला. जगभरात नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधात जागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस निवडला गेला आहे.
नागरिकांना त्यांची कायदेशीर व इतर कामे करण्यासाठी लाच घेणे किंवा देणे हा भ्रष्टाचार असून संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. आपल्या देशात भ्रष्टाचार विरोधात सरकारी पातळीवर कारवाई केली जात आहे. यासाठी या कायद्यानुसार लाच घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तसेच बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातही कारवाई होते. राज्यात दक्षता खाते, भ्रष्टाचार विरोधी पथक कार्यरत आहे. हे पथक राज्यातील सरकारी, राजकीय नेते इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करतात.

एसीबीच्या कारवाईची आकडेवारी (मागील ५ वर्षे)
- २०२० पासून एसीबीने १३ गुन्हे दाखल केले आहेत. २०२० पूर्वीचे ४२ गुन्हे एसीबीकडे प्रलंबित होते. त्यातील १२ गुन्ह्यांसंदर्भात एसीबीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले अाहे.
- मागील पाच वर्षांत एसीबीने यापैकी ३० गुन्ह्यांसंदर्भात अंतिम अहवाल सादर केले आहे. त्यामुळे एसीबीकडे सद्यःस्थितीत १३ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.
- मागील पाच वर्षांत सरकारी अधिकाऱ्यांविरोधात विविध प्रकारचे मिळून ६३९ तक्रारी दाखल झाल्या होत्या, तर २०२० पूर्वीच्या ४३८ तक्रारी प्रलंबित होत्या.
- यापैकी ९१४ तक्रारी एसीबीने निकालात काढल्या असून, १६३ तक्रारी प्रलंबित आहेत.