निरोप देऊनही तिघांची चौकशीला दांडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला दिलेल्या विविध परवान्यांप्रकरणी सरकारने दोन अधिकाऱ्यांसह तत्कालीन पंचायत सचिवाला निलंबित केले आहे. या तिघांनाही हणजूण पोलिसांनी पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजेरी लावण्याचा निरोप दिला होता. तरीदेखील सोमवारी त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावली नाही. त्यामुळे आता चौकशीसाठी हाजेरी लावण्याची नोटीस पोलिसांनी तिघांनाही जारी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो, पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर आणि हडफडे-नागवा पंचायतीचे तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांची हणजूण पोलीस चौकशी करणार आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतर हणजूण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.
आग लागलेल्या क्लबला मंजुरी देण्यासह घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीच स्पष्ट केले होते. त्यानंतर निलंबनाचा आदेश जारी झाला. निलंबनानंतर त्यांना आता हणजूण पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.