नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट यांनी सुरक्षा ऑडिट अहवाल तयार ठेवावा

१६ डिसेंबरपासून तपासणी; अहवाल नसल्यास आस्थापन होणार बंद


08th December, 11:52 pm
नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट यांनी सुरक्षा ऑडिट अहवाल तयार ठेवावा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाईट क्लब, बार, रेस्टॉरंट, इव्हेंट होणारी आस्थापने यांनी सात दिवसांत सुरक्षा ऑडिट अहवाल तयार ठेवावा, अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. सुरक्षा ऑडिट अहवाल नसल्यास आस्थापन बंद वा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कायदेशीर कारवाईही होऊ शकते, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याविषयीचा आदेश महसूल खात्याने जारी केला आहे. सात दिवसांनंतर तालुकास्तरावरील समिती १६ डिसेंबरपासून सुरक्षा ऑडिट अहवालाची तपासणी सुरू करणार आहे. ऑडिट अहवाल तयार नसला तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती दोन्ही ‌जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शनिवारी रात्री ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच सरकारने दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते. आवश्यक परवाने व सुरक्षा ऑडिट अहवाल तयार ठेवण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. पोलीस, अग्निशामक दल वा प्रशासनामार्फत १६ डिसेंबरपासून तपासणी सुरू केली जाईल, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.
क्लब, रेस्टॉरंंटच्या फायर सेफ्टी, तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांची तपासणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आता नाईट क्लब, रेस्टॉरंट यांच्या सुरक्षा व्यवस्थेची आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली तपासणी केली जाणार आहे. सर्व परवाने व सुरक्षा ऑडिट अहवालाची आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ (ब) खाली तपासणी केली जाईल. सुरक्षा ऑडिट अहवाल वा परवाने नसल्यास कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
तपासणीवेळी ‘या’ गोष्टींची होणार खातरजमा
फायर एनओसीसह अग्निशामक दलाच्या अटींचे पालन होत आह ना ?
ऑक्युपन्सीची क्षमता बाहेर नमूद केली आहे का ? ऑक्युपन्सीच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिला जात नाही ना ?
स्मोक/हीट डिटेक्टर्स, अलार्म्स, स्प्रींकलर्स, हायड्रंटस, फायर एक्स्टींग्युशर्सची व्यवस्था आहे ना ?
प्रमाणित असलेले इलेक्ट्रिकल वायरिंग आणि उपकरणे आहेत ना ?
आपत्कालीन एक्झीट मार्ग तसेच इवॅक्युएशन आराखडा आहे ना ?
कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते का ? प्रत्येक शिफ्टला फायर सेफ्टी अधिकारी असतो ना ?